कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावरील शेंद्रे ते कागल सहापदरीकरणासाठी कराड व मलकापूरच्या प्रवेशद्वारावरील उड्डाणपूल पाडण्याची अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केली असून, त्यानुसार वाहतुक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहे.
सध्या कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल जमीनदोस्त करण्याच्या तयारीसाठी उभारलेल्या संरक्षक अडथळ्यांमुळे (बॅरिकेटिंग) वाहतुकीचा गोंधळ उडाला आहे. वाहतूक कोंडीत शेकडो वाहने तासन् तास खोळंबून राहत आहेत. तरी, पोलीस अधीक्षकांच्या अधिसूचनेनुसार वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलामुळे वाहनधारकांना काय दिलासा मिळणार हे प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सदर अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर सहापदरीकरणाचे काम सुरु असून, कराड व लगतच्या मलकापूरमधील उड्डाणपुल काढुन टाकण्यात येतील. या कामी येत्या रविवारी (दि. ५) रात्री १२ वाजलेपासून पुढील आदेश येईपर्यंत वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार सातारा बाजुकडून कराड व पुढे कोल्हापुरकडे जाणारी उड्डाणपुलावरील वाहतुक सेवा रस्त्यावरुन आवश्यक त्याठिकाणी वळवुन मुख्य रस्त्यावरुन कोल्हापुरकडे वळवावी लागणार आहे. कोल्हापुरहुन सातारा बाजुकडे जाणारी वाहतुक लगतच्या सेवा रस्त्यावरुन सातारा बाजुकडे नियंत्रित केली जाईल. उड्डाणपुल पाडण्याचे काम २५ मार्चपर्यंत चालेल. नवीन सहापदरी उड्डाणपुल उभारण्यासाठी नेमलेल्या कंपनीस साधारणपणे २० महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
दरम्यान, कोल्हापूरकडून सातारा बाजुकडे जाणारी वाहतुक ढेबेवाडी फाटयावरील उड्डाणपूल कराडबाजुस ज्या ठिकाणी संपतो तेथे पश्चिमेकडील सेवारस्त्यावर वळविण्यात येईल. कोल्हापूरहुन कराडमध्ये येणारी वाहने एकेरी वाहतुकीने वारुंजीफाट्यापर्यंत येतील. पुढे जड वाहने पंकज हॉटेलसमोरुन सेवारस्त्याने महात्मा गांधी पुतळयासमोरुन कराडमध्ये जातील. हलकी वाहने वारुंजीफाटा येथुन जुना कोयना पूलमार्गे कराडमध्ये जातील.
कराडमधून कोल्हापुरनाका येथून बाहेर पडणाऱ्या वाहनांना कोल्हापूरकडे जाण्यासाठी सेवारस्त्याचा वापर लागेल. तर, कराडमधून सातारकडे जाणारी वाहने भादी हार्डवेअर समोरुन उजवीकडे यु-टर्न घेवुन इंडिअन ऑइल पेट्रोलपंपाजवळ सेवारस्त्याला मिळणार आहेत. सातारा ते कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक पंकज हॉटेलसमोरुन पश्चिमेकडील कोल्हापुर सातारा लेनवर वळविण्यात येईल. कोल्हापूरनाक्यावरील पूल संपलेनंतर पुर्वेकडील सेवारस्त्यावर एकेरी मार्गाने घेण्यात येईल. कृष्णा हॉस्पिटलसमोरील पूल संपलेनंतर गंधर्व हॉटेलजवळ वाहतुक पुर्ववत महामार्गावर घेण्यात येईल.
सातारकडून कोल्हापुरकडे (वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल) व कोल्हापूरकडून साताराकडे (कोयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतुक एकेरी वाहतुक असलेने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास आणि या मार्गावर वाहने थांबवण्यास मनाई असेल. कराड बाजूकडून ढेबेवाडीकडे जाणारी वाहतुक कोल्हापूर नाका ते ढेबेवाडी फाटापर्यंत एकेरी मार्गाने ढेबेवाडी फाटापर्यंत जावुन पूलाखालून ढेबेवाडीकडे जाईल. ढेबेवाडी बाजुकडुन कराडकडे येणारी वाहतुक ढेबेवाडी फाटा येथुन पश्चिमेकडील सेवारस्त्याने वारुंजी फाटामार्गे कराडमध्ये येईल. जड वाहनांना केवळ रात्रीच्या वेळी वाहतुकीस परवानगी राहील. कोल्हापुर नाका ते पंकज हॉटेल मार्गावरील भुयारी मार्ग बंद राहील असे अधिसूचनेत म्हटले आहे.