सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून जाणा-या नागपूर-गोवा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतक-यांचा विरोध असताना दुसरीकडे सुरत-चेन्नई हरित राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी देण्यासही बहुसंख्य शेतक-यांचा विरोध कायम आहे. सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठी जमिनी बाधित होणा-या शेतक-यांचे आंदोलन उभारण्यासाठी येत्या रविवारी,७ जुलै रोजी सोलापुरात शेतकरी परिषद होणार आहे. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात माकपचे नेते नरसय्या आडम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शेतकरी परिषदेस काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे व कामगार सेनेचे नेते रघुनाथराव कुचिक आदी उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे संयोजक महारूद्र जाधव यांनी याबाबतची माहिती दिली. या परिषदेस सुमारे २५० बाधित शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचे जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ठाकरे गटाच्या आमदाराचं देवेंद्र फडणवीसांकडून तोंडभरुन कौतुक; सभागृहात नेमकं काय घडलं?
सुरत-चेन्नई हरित राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून जाणार आहे. त्याची या चारही तालुक्यातील लांबी १५१ किलोमीटर असून त्यासाठी ६१ गावांतील जमिनी संपादित केल्या जात आहेत. यात ६७८ प्रकरणांमध्ये ५३४ कोटींचा निधी मोबदला म्हणून देण्यासाठी प्राप्त झाला आहे. त्यापैकी २९५ कोटींचा मोबदला बाधित शेतक-यांना अदा झाला आहे. मात्र बहुसंख्य शेतक-यांनी जमिनी द्यायला विरोध दर्शविला आहे. विशेषतः अक्कलकोट तालुक्यातील सर्व बाधित १७ गावांच्या शेतक-यांचा जमिनी देण्यास तीव्र विरोध आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतक-यांनी विरोध दर्शविला आहे. या प्रश्नावर अलिकडेच मोहोळ येथे शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बाधित शेतक-यांचा मेळावा झाला होता.