महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली. आमच्यावर कुणीही कारवाई करु शकत नाही कारण आम्हीच मूळ पक्ष आहोत आणि चिन्हही आमच्याकडेच आहे असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. तसंच प्रफुल्ल पटेल यांनी या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. तसंच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्याचं पत्र आम्ही रविवारी (२ जुलै) अध्यक्षांना दिलं आहे असंही त्यांनी सांगतिलं.
काही वेळापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत तुमच्याकडे नेमके किती आमदार आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की बहुसंख्य आमदार आहेत म्हणूनच तर हा अजित पवार या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून बसला आहे असं रोखठोक उत्तर अजित पवार यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी याविषयी प्रफुल्ल पटेल यांना बोलण्यास सांगितलं.
प्रफुल्ल पटेल संख्येविषयी काय म्हणाले?
“आम्हाला जे लोक विचारत आहेत की तुमच्याकडे किती संख्या आहे? त्यापेक्षा त्यांनी सांगावं की त्यांच्याकडे किती आमदार आहेत. जरा चाचपणी करावी. पक्षातल्या बहुसंख्य लोकांची काय इच्छा आहे? तुमच्याकडे किती संख्या आहे सांगा. आमची शरद पवारांना हात जोडून विनंती आहे की पक्षाचे बहुसंख्य आमदार, वरिष्ठ नेते, बहुसंख्य कार्यकर्ते यांच्या इच्छेचा त्यांनी आदर करावा. आमच्याकडून कुठलाही वाद नाही. मात्र जे चित्र निर्माण केलं आहे ते संपलं पाहिजे. त्यांचा आशीर्वाद हवा आहे.”
छगन भुजबळ काय म्हणाले?
“आज गुरु पौर्णिमा आहे, शरद पवार हे आमचे गुरु आहेत. आम्ही जे पाऊल उचललंय त्यासाठी आम्ही त्यांचे आशीर्वाद मागत आहोत” असं भुजबळ म्हणताच गुरुदक्षिणा काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले, “आम्ही गुरुदक्षिणा दिली ना उपमुख्यमंत्री झाला ना राज्याचा.”
अजित पवार म्हणाले की वर्षभर आम्ही विरोधात होतो आता आमचा पक्ष सत्तेत आला ना? कार्यकर्त्यांची कामं आता पटापट होणार. सगळी कामं मार्गी लागणार आहेत. हीच गुरुदक्षिणा आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.