सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांना मिळालेले मताधिक्य पाहता आजही या राजघराण्याची या मतदारसंघावर किती पकड आहे, हेच दर्शवते. पण याच बरोबरीने चांगले वातावरण असतानाही सक्षम उमेदवार न दिल्याने महायुतीने इथे विजयाची संधी दवडली असेही म्हणावे लागेल.
ही निवडणूक जाहीर झाली त्या वेळी उदयनराजे यांना उमेदवारी मिळणार का असा जसा प्रश्न विचारला जात होता, तसेच त्यांच्या विरोधात कोणाला उभे करायचे हादेखील प्रश्न होता. सातारा लोकसभेची जागा शिवसेनेच्या ताब्यात होती. महायुतीतील घटक पक्ष आरपीआय यांच्या मागणीनुसार ही जागा त्यांना देण्यात आली. या जागेवर महायुतीचा घटक पक्ष आरपीआयकडे उमेदवार नसल्याने उदयनराजे यांनी पहिली फेरी जिंकली होती. आरपीआयअंतर्गत असलेली भांडणे, उमेदवार निश्चितीतला महागोंधळ, पूर्वी ठरलेल्या संभाजी संकपाळ यांची उमेदवारी अपमानास्पदरीत्या रद्द करणे, उदयनराजेंच्या मागेपुढे करणारे अशोक गायकवाड यांना ती देणे यातून राज्यात असणारा मोदी लाटेचा फायदा मिळवण्यात महायुती अपयशी ठरली. लढण्याआधी महायुतीचे आव्हान संपले होते. अपक्ष असलेल्या पुरुषोत्तम जाधव किंवा आम आदमीच्या राजेंद्र चोरगे यांनी जेवढी मते मिळवली तेवढी मतेही महायुतीला त्यामुळे मिळवता आली नाही. महायुतीच्या प्रचारात एकजिनसीपणा कधी दिसला नाही. याउलट राजेंद्र चोरगे यांच्या प्रचारात शिस्त होती. तर जाधव यांनी प्रत्येक पक्षातील नाराजांना आपल्याकडे वळवले होते. साहजिकच महायुतीचा प्रभाव सातारा लोकसभेत जाणवला नाही. या वेळी महायुतीचा जोर होता. पुरुषोत्तम जाधव काटय़ाची टक्कर देतील अशी परिस्थिती होती. हिंदुराव नाईक निंबाळकरांनंतर अर्थात १९९३ नंतर पुन्हा एकदा शिवसेनेला भगवा फडकवता आला असता, मात्र सेनेने उदार मताने ही जागा केवळ आरपीआयलाच नाहीतर राष्ट्रवादीला दान केली असेच म्हणावे लागेल. जाधव यांनी अपक्ष असून दिलेली झुंज एकाकी होती. शिवसेनेकडे तसेच आरपीआयकडे त्यांनी उमेदवारी मागीतली होती. मात्र त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर आरपीआयकडून निवडणूक लढवण्याची जी अट नेत्यांना सांगितली, त्यामुळे त्यांना जागा अपक्ष म्हणून लढावी लागली.
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची जागा पुन्हा ताब्यात ठेवत हा पक्षाचा आणि आपला बालेकिल्ला आहे हे दाखवून दिले. या लोकसभा मतदारसंघात सहाच्या सहा आमदार आघाडीचे आहेत. त्यापकी विलासराव पाटील आणि शिवेंद्रसिंहराजे वगळता सगळे उदयनराजेंवर नाराज आहेत अशी परिस्थिती होती. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला उघड विरोध दर्शवला होता. त्या पार्श्र्वभूमीवर काय होणार, मताधिक्य किती कमी होणार अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्हा पिंजून काढला. पाच सभा घेतल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही जातीने लक्ष दिले. तीन वेळा ते या मतदारसंघात येऊन गेले. मिळालेले मताधिक्य पाहता मंत्री शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. विक्रमसिंह पाटणकर या सगळय़ांनी राजेंचे काम केले हे सिद्ध होते. तर काँग्रेसशी असणारी जवळीक राजेंना बळ देणारी ठरली. यात सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा महायुतीला राजेंच्या विरोधात चांगला उमेदवार उभा करता आला नाही. उदयनराजेंना ५ लाख २२ हजार ५३१ मते पडली, तर सर्व विरोधकांची तसेच नकाराधिकाराची मते विचारात घेतली तर ती ४ लाख ५० हजार ४३२ होतात. या मतांसह नरेंद्र मोदींची एक सभा झाली असती तर सांगली, सोलापूर येथे लागलेल्या निकालाचा संदर्भ या मतदारसंघालाही लावता आला असता.
विशेष म्हणजे १० हजार ५८९ मते नकाराधिकाराची आहेत. एकूण १८ उमेदवारांपकी नोटाची मते ९व्या क्रमांकावर आहेत हे विशेष आहे. या मतांचा विचार विधानसभेच्या निवडणुकीत सगळय़ाच पक्षांनी केला पाहिजे. एकूण राजेंचा विजय झाला असला तरी गेल्या वेळेपेक्षा मताधिक्य वाढले असले तरी त्यांच्या एकूण मतात १० हजार मतांची घट झाली आहे हे वास्तव आहे. मतांची विभागणी विरोधकांत झाली. सक्षम उमेदवार महायुतीने दिला नाही, राजेंची प्रचारयंत्रणा गावोगावी पोचली, वाढलेला मतदानाचा टक्का विरोधकांकडे गेला, आघाडीबद्दल असलेली नाराजी विरोधकांना मतपेटीत गोळा करता आली नाही आणि देशपातळीवर मोदी फॅक्टर, कमळ उमलत असले तरी सातारा लोकसभा मतदारसंघातून कमळ, धनुष्यबाण हद्दपार झाले हेच या निवडणुकीचे सार असेल.
साता-यात राजांची पकड आणि विरोधकांची हारगिरी उघड
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांना मिळालेले मताधिक्य पाहता आजही या राजघराण्याची या मतदारसंघावर किती पकड आहे, हेच दर्शवते. पण याच बरोबरीने चांगले वातावरण असतानाही सक्षम उमेदवार न दिल्याने महायुतीने इथे विजयाची संधी दवडली असेही म्हणावे लागेल.

First published on: 18-05-2014 at 03:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majority to udayanraje bhosle in satara