पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्य पारदर्शीपणे व गुणवत्तापूर्वक बजावून जनतेच्या मनात देशभक्त पोलीस अशी प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शनिवारी तूरची येथे बोलताना व्यक्त केले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र तूरची येथे आज २२४ पुरुष व 5 महिला अशा २२९ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या १०९ व्या सत्राचा दीक्षांत संचलन कार्यक्रम तसेच शपथग्रहण समारंभ गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समारंभास पोलीस अधीक्षक दिलीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या सुरक्षेसाठी सन्यदल जितके महत्त्वाचे तितकेच राज्याचे पोलीस दलही महत्त्वाचे असल्याचे सांगून गृहमंत्री आर.आर.पाटील म्हणाले की, पोलीस दलाच्या वतीने राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच जनतेच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले जाते. तूरची पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन गृहविभागात सेवा बजावताना पोलीस अधिकाऱ्यांनी आपण आपली कर्तव्ये कायद्याच्या नियमाप्रमाणे सांभाळावी, कायद्यासमोर सर्व समान आहेत, ज्या राज्यामध्ये चांगला कायदा व सुव्यवस्था तेथेच चांगली प्रगती होत असते, आजच्या गुन्ह्यांच्या बदललेल्या स्वरूपाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहनही गृहमंत्री पाटील यांनी केले.
तूरची पोलीस प्रशिक्षण केंद्रामधून आतापर्यंत ७८० पोलीस अधिकारी प्रशिक्षण घेऊन गृहविभागात आपले कर्त्यव्य बजावत आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यकठोरतेतून जनतेच्या मनात देशभक्त पोलीस अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी नेहमीच कार्यरत रहावे. राज्याचे पोलीस दल अधिक सक्षम करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून आगामी पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यात ६५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची व त्याच प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्य पोलीस दलात महिला पोलीस सर्वाधिक असून त्या वाहतूक, आतंकवादी, नक्षलवादी या सर्व ठिकाणी लढताना व काम करताना अग्रेसर आहेत, असे सांगून गृहमंत्री आर.आर.पाटील म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जनतेला उत्कृष्ट सेवा द्याव्यात. जनतेचे सेवक म्हणून आपले कर्त्यव्य पार पाडावे. आपल्या घटनेचे व कायद्याचे रक्षण करावे. सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा व एक यशस्वी पोलीस अधिकारी होण्यासाठी आपली सदैव धडपड असावी. याबरोबरच प्रशिक्षणार्थी गृहविभागाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी, नातेवाईकांनी त्यांच्या कडून गर व अवाजवी अपेक्षा ठेवू नयेत, असा सल्लाही गृहमंत्री पाटील यांनी दिला.
महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमीचे संचालक नवल बजाज यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, ते म्हणाले की, तूरची पोलीस प्रशिक्षण केंद्रातून यापूर्वी सत्र १०४, १०८ व आता सत्र १०९ यशस्वीपणे पार पडली आहेत. नऊ महिने प्रशिक्षण पूर्ण करून हे उमेदवार गृहविभागाच्या सेवेत दाखल होत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे काम करावे, कायद्याप्रमाणे गरजूंना योग्य न्याय देण्यासाठी आपली धडपड ठेवावी व आपले मनोधर्य नेहमी उच्चपातळीचे ठेवावे, असे सांगून प्रशिक्षणार्थ्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणकाळातील उत्कृष्ट कौशल्याबद्दल पारितोषिकांचे वितरण करण्यात आले, बेस्ट कॅडेट इन टर्न आऊट शांतिलाल देविदास चव्हाण, एन.एम.कामटे गोल्ड कप फॉर बेस्ट कॅडेट इन रायफल एॅन्ड रिव्हॉल्वर शूटिंग मत्रानंद विष्णु खंदारे, एस.जी. इथापे बेस्ट बीहेव्हड कॅडेट प्रशांत एकनाथ भोयर, सावित्रीबाई फुले बेस्ट वुमन कॅडेट इन इनडोर सब्जेक्ट सीमा मारुती खाडे, बेस्ट कॅडेट इन स्टडीज (सिल्वर बटन) चंद्रकांत पांडुरंग कोसे, बेस्ट कॅडेट इन मॉर्डन टेक्नोलॉजी वैभव ज्ञानेश्वर महागरे, बेस्ट कॅडेट इन पी.टी. सोमनाथ द्रोणाचार्य नरके, बेस्ट कॅडेट इन स्पोर्ट शैलेश चंद्रकांत पवार, बेस्ट कॅडेट इन लॉ विक्रांत महादेव थारकर यांचा समावेश होता.
सुरुवातीला गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी प्रशिक्षणार्थी जवानांच्या कवायतीचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. तूरची पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थ्यांना पदाची शपथ दिली. समारंभास तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा