शेतकऱ्यांना मागितल्यावर कर्जपुरवठा झाला पाहिजे असे नियोजन करण्याची सूचना रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी जिल्ह्य़ातील बँकांना केली आहे. खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर अलिबाग इथे आयोजित पतपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. खासगी बँकांना या वर्षी शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी मोठे उद्दिष्ट देण्यात आले आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र तरीही खासगी बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. रायगड जिल्ह्य़ाला या वर्षी १५२ कोटींचे पतपुरवठा उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ५५ कोटी, खासगी बँकांना ६६ कोटी, तर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३० कोटी पतपुरवठा उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना पतपुरवठा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज सर्व बँकांची एक बैठक बोलावण्यात आली होती. यात पालकमंत्री सुनील तटकरे यांनी रायगडातील पतपुरवठा परिस्थितीचा आढावा घेतला. ६७ लाख रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला. खासगी बँकांकडून केवळ ३८ लाख रुपयांचा पतपुरवठा झाला आहे, तर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून आत्तापर्यंत १३ कोटी २४ लाख रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला आहे. १५२ कोटींच्या उद्दिष्टांपैकी आत्तापर्यंत जवळपास २६ कोटी ५ लाख रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला आहे. खासगी बँकांच्या शाखा लक्षात घेतल्या तर या बँकांना देण्यात आलेले ६६ कोटींचे उद्दिष्ट खूप जास्त असल्याचे तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँका आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेलाच यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही खासगी बँकांनीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी प्राप्त उद्दिष्टाच्या ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्ह्य़ातील बँकांना यश आले होते. या वर्षी प्राप्त उद्दिष्ट पूर्ण करण्यात बँकांना यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा