लोकसत्ता प्रतिनिधी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करावयाचा आहे, त्यासाठी कोणतीही तडजोड न करता अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी तातडीने कारवाईची मोहीम सुरु करावी. कोणाचाही फोन आला तर, त्याची डायरीला नोंद घ्या. असे निर्देश देतानाच, पोलीसांच्या या मोहिमेला प्रसिध्दी माध्यमांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही, नियंत्रण व जनजागृतीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर ‍सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अंमली पदार्थाचा थेट परिणाम युवा पिढीवर होत आहे. हे प्रत्येक गावाचे दु:ख आहे. ग्रामीण भागातील युवक मृत्युमुखी पडत आहेत. पोलीस चांगले काम करीत असतात. या सामाजिक मोहिमेत माध्यमांनीही त्यांना सहकार्य करावे. अंमली पदार्थांबाबत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी. कोणत्याही विशिष्ट धर्माचे वा जातीचे गुन्हेगार यात दिसून येत नाहीत. आरोपींची यादी पाहिली असता सरसकट आहेत, हे दिसून येते.

राज्यात अंमली पदार्थ मुक्त आपला रत्नागिरी जिल्हा करुया, असे सामंत यांनी सांगितलं. अंमली पदार्थ मुक्त जिल्ह्याचा रत्नागिरी पॅटर्न राज्यात जाईल, अशा पध्दतीने ही मोहीम तीव्र राबण्याची सुचना पोलिसांना देण्यात आल्या.

विक्रेता आणि वापरकर्ता दोघांवरही कारवाई

अंमली पदार्थाचे सेवन करणाराही विक्री करणाऱ्या एवढाच दोषी आहे. अंमली पदार्थ विक्रेता आणि त्याचे सेवन करणारा या दोघांवरही सारखीच कारवाई होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थीनी, तरुणांनी अंमली पदार्थाचे सेवन करु नये. त्याची विक्री करणारे तसेच वापर करणारे यांच्याविषयीची माहिती जर, कोणाला असेल तर त्यांची नावे पोलीसांना कळवावीत. कळवणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.