राज्यातील आघाडी सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने खंडकरी शेतकऱ्यांची दिवाळी नव्या आशेचा दीप पेटवून आता सुरू झाली आहे. खंडकऱ्यांनी गेली ७० वर्षे संयमाने दीर्घ लढा दिला. संयमाने, चर्चेने प्रश्न सुटतात. राज्यातील शेतकऱ्यांचे दु:ख आम्हाला माहीत आहे. त्यांचे अश्रू पूसण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र कोणत्याही आंदोलनास हिंसक वळण लावू नका, ते चर्चेने सोडवू, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे केले.
खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीच्या सात-बाराचे वाटप सोमवारी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ते बोलत होते.
अत्यंत संयमाच्या मार्गाने खंडकरी शेतकरी दीर्घ काळ जमिनीसाठी लढले. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना शेतकऱ्यांना शासनाने अभ्यासू विधिज्ञ देऊन मदतीचा हात पुढे केला. कोणतेही प्रश्न चर्चेने, सामंजस्याने जसे सुटू शकतात,तसे हिंसक आंदोलनाने सुटत नाहीत असेही ते म्हणाले.