लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी महापौर पदाचा राजीनामा देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्व व नगरसेवकांना खेळवण्यात सुरुवात केली आहे. सोमवारच्या सर्वसाधारण सभेवेळी राजीनामा देण्याचा पवित्रा अचानक बदलून त्यांनी पुढच्या सभेकडे बोट दाखवले असले, तरी या सभेवेळी तरी त्या राजीनामा देणार का याविषयीची साशंकता कायम आहे. महापौर पदाचा राजीनामा दिला, तर आपल्याला लाचखोरीच्या प्रकरणात वाचविण्यासाठी कोणीच पुढे येणार नाही या प्रकरणात आपण एकाकी पडू अशी भीती वाटत असल्याने महापौर माळवी यांनी होईल तितका अधिक काळ महापौर पदाची कवच कुंडले स्वतभोवती कायम राखण्याचा पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांची घालमेल मात्र वाढीस लागली आहे.
जमीन संपादनाच्या व्यवहारात १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल महापौर तृप्ती माळवी व त्यांचा स्वीय सहायक अश्विन गडकरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल करीत लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या प्रकरणात अटक व्हावी लागलेली महापौर तृप्ती माळवी ही पहिली राजकीय व्यक्ती ठरली. स्वाभाविकच त्यांच्याविषयी शहरवासीयांतून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आल्याने नागरिक, भाजप, शिवसेना यांनी महापौर माळवी यांनी नतिक जबाबदारी स्वीकारून महापौर पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत महापालिकेवर मोच्रेही काढले.
याच वेळी लाचखोरीच्या प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच गांगरून गेला. महापालिकेची निवडणूक ६ महिन्यांवर येऊन ठेपली असताना पक्षाचा महापौर लाचखोरीत अडकल्याच्या प्रकरणाचा फटका पक्षाला बसू शकतो अशी भीतीही पक्षनेतृत्वात निर्माण झाली. त्यामुळेच माळवी या इस्पितळात उपचार घेत असतानाच त्यांच्याकडून महापौर पदाचा राजीनामा पक्षाने घेतला. पण इतक्याने महापौर पदाचा राजीनाम्याची प्रक्रिया संपणारी नव्हती त्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी आयुक्तांकडे राजीनामा सादर करणे गरजेचे होते. स्वाभाविकच राष्ट्रवादी काँग्रेसला सोमवारच्या सर्वसाधारण सभेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पण हाय रे दैवा, सभा संपली तरी महापौर माळवी यांनी राजीनामा दिलाच नाही. राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आपण नव्हतो असे नमूद करीत पुढील सभेवेळी राजीनामा देऊ असे दोन तासांच्या मनधरणी आणि दबाव प्रक्रियेनंतर स्पष्ट केले.
१६ मे रोजी महापालिकेची सभा होणार असली, तरी तेव्हा तरी माळवी महापौर पदाचा राजीनामा देणार का, या विषयीची शंका कायम आहे. महापौर पदाचा राजीनामा दिला तर लाचखोरीच्या प्रकरणात आपल्याला मदत करण्यासाठी पक्ष पुढे येणार नाही. शिवाय एकदा का राजीनामा दिला, की पक्ष लाचखोरीच्या प्रकरणाकडे बोट दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करून वाऱ्यावर सोडले जाईल अशी भीतीही त्यांना वाटते. महापौर पदाला आणखी काळिमा लागू नये यासाठी पक्ष व नेतृत्व खबरदारी घेईल अशी भूमिका माळवी यांची दिसून येत आहे. त्यामुळे त्या आगामी सभेत खरोखरच राजीनामा देणार की बंडाचा झेंडा हाती घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Story img Loader