डहाणू तालुक्याच्या किनारपट्टी भागातील चिंचणी ते धाकटी डहाणू भागातील अनेक गावांत डेंग्यूची आणि मलेरिया, टायफॉइडची लागण झाली असून, यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अनेक खासगी आणि सरकारी रुग्णालयांत रुग्ण मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. मात्र याकडे आरोग्य विभागाने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे चित्र जाणवत असून, सततच्या पावसाने साथीचे थैमान घातले आहे. सतत दीड महिना पाऊस कोसळत असल्याने साथीच्या रोगांना अनुकूल वातावरण असल्याने त्यांनी आता डोके वर काढले आहे. मागच्या वर्षीदेखील किनारपट्टी भागातील डहाणू, चिंचणी, वरोर, वाढवण, वासगांव या गावातील अनेक डेग्यूच्या रुग्णांना मुंबई आणि बसाडच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. या वेळी दोघांचे बळीही गेले होते. या वर्षीदेखील याच पट्टय़ातल्या गावांत डेग्यूच्या आजाराबरोबरच मलेरिया, टायफॉईड, सर्दी, खोकला या आजारांनी थैमान घातले आहे. चिंचणी, डहाणू, वाणगाव, कासा येथील खासगी तसेच सरकारी रुग्णालयांत रुग्णांची दररोज मोठी गर्दी होत असल्याने अनेक रुग्णालयांत ताटकळत बसावे लागत आहे. डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइडसारखे आजार मोठय़ा प्रमाणावर फैलावण्यापूर्वीच आरोग्य प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याकडे आरोग्य प्रशासक पुरेसे लक्ष देत नसल्याने या परिसरातील साथीचे आजार गंभीर रूप धारण करीत असतात. दरम्यान, बावडा येथील दहा रुग्णांबरोबरच तेथील उपसरपंच रमाकांत जाधव यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; तर माजी उपसरपंच राजाराम जाधव हे खासगी रुग्णालयात असून, चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रातून चार रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याशिवाय अनेक गावांतील मलेरिया, टायफॉईड, ताप, सर्दी, खोकला झालेले रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा