मलेरियाच्या रुग्णांमध्ये मात्र घट

रायगड जिल्ह्यात मलेरियाचे प्रमाण घटले असले तरी डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात डेंग्यूचे १८ रुग्ण आढळून आले आहेत. यात महाड आणि तळा तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी मलेरियाचे २९२ रुग्ण आढळून आले होते. उपाययोजनांमुळे हे प्रमाण घटत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात मलेरियाचे १३३ रुग्ण आढळून आले आहेत. यात पनवेलमधील ९१ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात मलेरियाचे प्रमाण घटत असले तरी डेंग्यूसारख्या घातक आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात डेंग्यूचे १८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात महाड आणि तळा येथे यापूर्वीच डेंग्यूची साथ असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र  उपाययोजनांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला यश आले. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे परीसरात डेंग्यूची लक्षणे असणारी ५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे या आजाराला गांभीर्याने घेण गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांनी सांगितले.

डेंग्यूची लक्षणे

लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठय़ा माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ  शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.

नागरिकांनी हे करावे..

  • पाणी १५ मिनिटे उकळून व गाळून प्यावे.
  • ताजे आणि गरम अन्नच खावे.
  • दिवसातून किमान पाच लिटर पाणी प्यावे.
  • सार्वजनिक ठिकाणी रुमाल, मास्क वापरावा.
  • सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या, घरातील भांडी स्वच्छ ठेवा.
  • डासांपासून स्वसंरक्षण करा.
  • आठवडय़ातून एक दिवस कोरडा दिवस पाळा

नागरिकांनी हे करू नये..

  • कोणताही आजार अंगावर काढू नये.
  • घरातील रुग्णाला बाहेर जाऊ देऊ नये.
  • रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा
  • घरगुती उपचार टाळावेत

 

Story img Loader