राज्यात युतीचे शासन सत्तेवर येताच मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले वचन पूर्ण करण्याची तसेच मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
तालुक्यातील गिरणा व मोसम नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन व नदीजोड कालव्यांच्या सर्वेक्षण कामांची सुरुवात करण्याच्या निमित्ताने येथे आलेल्या उद्धव ठाकरे यांची शनिवारी सायंकाळी येथील पोलीस कवायत मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा नसताना गिरणा, मोसमवरील बंधाऱ्यांचे काम सुरू झाले, परंतु मालेगाव जिल्हा का झाला नाही, हा खरा प्रश्न असल्याचे सांगितले. मालेगाव जिल्हानिर्मितीचे शिवसेनाप्रमुखांनी वचन दिले होते. युती सत्तेवर येताच ते आपण पूर्ण करू. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासंदर्भात राज्यातील खासदार बोलत नाहीत. आपण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे वचन देतो. नद्यांचा प्रवास बदलून या भागात पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीे. राज्यात शेतकरी, व्यापारी कोणीही सुखी नाही. जातीयवादी म्हणून आमच्या डोक्यावर शिक्का मारून चालणार नाही. पाणी दिल्यावर ते फक्त हिंदूंच्याच घरात जाणार आहे का? अल्पसंख्याक पिणार नाहीत काय? मग आमच्यावर वार करू नका, ते आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
आपण कोणाला मस्का मारायला आलेलो नाही. मालेगावात शांतता आहे. आम्हाला शांतताच हवी आहे, पण ओवेसीविरुद्ध खटला का दाखल करीत नाहीत, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. देशातील हिंदू आणि मुसलमानांनी देशाभिमान बाळगून एकत्र यावे. आम्हाला हिंदुस्थान मजबूत करून दाखवायचा असल्याने देशाची ताकद वाढविण्यासाठी एकत्र येण्याचे  आवाहनही ठाकरे यांनी केले. प्रारंभी आ. दादा भुसे, जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, अल्ताफ खान, शहरप्रमुख रामा मिस्तरी आदींची भाषणे झाली. या वेळी आ. विनायक राऊत, आ. बबन घोलप, अजय बोरस्ते, जयंत दिंडे, प्रमोद शुक्ला आदी उपस्थित होते.

Story img Loader