मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आता मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटिक वर्गाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. नेमकं हे प्रकरण काय? विरोधकांचे आरोप काय? जाणून घेऊ.
विरोधक मल्हार प्रमाणपत्रावरुन आक्रमक
मात्र यावरुन आता विरोधी बाकांवरच्या आमदारांनी आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात नवा वाद उकरुन काढण्यासाठी हे केलं जातं आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर आप आणि एआयएमआयएम यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित पवारांनी मल्हार प्रमाणपत्र देणारी कंपनी कुणाचीह आहे? हे सांगा असंही म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी मल्हार मटण प्रमाणपत्राबाबत काय म्हटलं आहे?
मल्हार प्रमाणपत्र ही एक खासगी कंपनी आहे. जर ही योजना सरकारची आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचं उद्घाटन करायला हवं होतं. तसंच मटणाला मल्हार प्रमाणपत्र देणारी ही कंपनी कुणाची आहे? याची माहिती मिळाली पाहिजे.
जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं आहे?
“हलाल विरुद्ध मल्हार प्रमाणपत्र असलेलं मटण असा वाद मी ऐकला. मी सांगू इच्छितो की हलाल हा शब्द कायद्याला धरुन आहे. जागतिक पातळीवर हलाल हा शब्द वापरला जातो. हलाल मीट म्हणजे कायदेशीर रित्या असलेलं मटण. पशू बळी दिल्यानंतर त्याचं रक्त वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो. रक्त साकाळून त्याचं रक्त मिसळणार नाही म्हणून हे केलं जातं. आपल्याकडे जे पशूबळी दिले जातात ते बळी हलाल पद्धतीनेच दिले जातात. तुळजापूरच्या भवानीला जातो, खंडोबाला जातो तेव्हा तिथला खाटिक हलाल पद्धतीनेच बळी देतो. कारण त्याला पशूमधलं रक्त बाहेर काढायचं असतं. आत्तापर्यंत वाद निर्माण झालेला दिसला नाही. आता नवे वाद निर्माण करायचे आहेत असं दिसतं आहे. मल्हार प्रमाणपत्राचं मटण असेल तर ते कुठल्या पद्धतीने मटण विक्री करणार आहेत? झटका देणार आहेत का? झटका ही पद्धत फक्त पंजाब प्रांतात आणि खास करुन शीख समुदायात वापरली गेली. त्यावरुन वाद घालावा असं काही मोठं नाही. वर्षानुवर्षे आमचे आई-वडील, बहीण, भाऊ मटण आणायला जातात. बोकडाचा पाय दे वगैरे सगळं निवडून सांगितलं जातं. आता मटण विक्री-खरेदीमध्येही वाद निर्माण करायचा आहे का? मासे कसे कापणार? मल्हार की हलाल? ते पण सांगा. मला काय चाललं आहे महाराष्ट्रात तेच कळत नाही. मी विचारतो मच्छी कशी खायची? हलाल खायची की मल्हार खायची? नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुस्लीम वाद निर्माण करायचा हे दिसतं आहे. आत्तापर्यंत गावागावांमध्ये कसाई आणि खाटिक एकत्र दुकानं लावत होते. छोट्याश्या गावांमध्ये बाहेर खाटिक किंवा कसाई यांची दुकानं दिसतात. लोक येतात मटण घेतात आणि जातात. शांत पद्धतीने सगळं सुरु आहे. अशात ही आग लावण्याची गरज काय आहे? महाराष्ट्राचं जातीय द्वेषाच्या माध्यमातून विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही का? दिवसाला २०० ते ५०० रुपये कमावतो असा माणूस यात मरणार आहे” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
मल्हार सर्टिफिकेट काय आहे? ते कसली हमी घेण्याचा दावा करतं?
मल्हार सर्टिफिकेट हे झटका मटणासाठीचं प्रमाणपत्र आहे. हे सर्टिफिकेट खाटिकांसाठी आहे.
हे प्रमाणपत्र सांगतं की ज्या बकरी, शेळीचं हे मटण आहे ते हिंदू रिती रिवाजाने कापण्यात आलं आहे आणि त्यात भेसळ नाही.
दुसऱ्या कुठल्याही मटणाची भेसळ शेळी किंवा बकरीच्या मटणात नाही याची खात्री हे सर्टिफिकेट देतं.
सर्वात महत्त्वाचं हे मल्हार सर्टिफिकेट फक्त हिंदू खाटिक आणि हिंदू समाजाच्या मटण विक्रेत्यांनाच मिळणार आहे. या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.
AIMIM चे प्रवक्ते असीम वकार काय म्हणाले?
महाराष्ट्र सरकार म्हणजे नितेश राणे नाही. देवेंद्र फडणवीस यांनी असा काही निर्णय घेतला आहे का? मुस्लिम आणि हिंदू यांची ही लढाई नाही. हा वाद आता देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांच्यातला आहे. नितेश राणेंसारखे लोक काय भारताचे संविधान चालवणार आहेत का? नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांचं ऐकणार की देवेंद्र फडणवीस नितेश राणेंचं? असा सवाल AIMIM चे प्रवक्ते असीम वकार यांनी केला आहे.
आप आणि सपाचं म्हणणं काय?
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मल्हार आणि हलाल या दोन मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे. लोकांना मल्हार झटका मटण हवं असेल तर त्यांनी ते घ्यावं. मात्र आमचं एकच म्हणणं आहे सरकारची या निर्णयाबाबत काय भूमिका आहे? तर आपचे खासदार मलविंदर सिंह कांग यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे. नितेश राणे समाजात दुही माजवू इच्छितात त्यामुळे त्यांनी या धोरणाला पाठिंबा दिला आहे असा आरोप कांग यांनी केला.
नितेश राणे यांनी काय म्हटलं आहे?
“महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक महत्त्वाचं पाऊल मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरु झालं आहे. झटका मटण आणि मल्हार सर्टिफिकेशन ही संकल्पना हिंदू समाजासाठी आणली आहे. या माध्यमातून आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे १०० टक्के हिंदू समाजाचं प्राबल्य असेल. मटणात भेसळ नसेल. अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतात. हिंदू समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचारांच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी टाकलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा. ज्या मटणाला हे प्रमाणपत्र नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये, मटण घेऊ नये. या सगळ्या प्रयत्नांना आमचा १०० टक्के पाठिंबा आहे.” असं नितेश राणेंनी म्हटलं होतं. आता यावरुनच वाद निर्माण झाला आहे.