कष्टकरी माळी समाजाच्या पुणे जिल्हय़ातील बहुतांश जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाने केले, असा घणाघाती आरोप करून विकासापासून दुर्लक्षित फुले दाम्पत्याचे जन्मगाव आरणला तीर्थक्षेत्र अ दर्जा देऊ, अशी घोषणा आमदार पंकजा मुंडे यांनी केली. संघर्षयात्रा राज्यात सत्तापरिवर्तन घडवेल, असा विश्वासही व्यक्त केला.
सावता परिषदेच्या वतीने येथे माळी समाजपरिवर्तन मेळावा शनिवारी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. आमदार विनायक मेटे, माजी आमदार अशोक मानकर, अतुल सावे, भास्कर आंबेकर, रमेश आडसकर व संयोजक परिषदेचे कल्याण आखाडे उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात परिवर्तन घडविण्यासाठी आधी स्वतमध्ये परिवर्तन केले. त्यांच्या पुण्याईनेच आपण आज लोकांसमोर उभे आहोत. मात्र, महापुरुषांना जातीपुरते मर्यादित करणे चुकीचे आहे. जात जन्माने मिळते. आपला जातीवर विश्वास असला, तरी जाती-भेद व जातीयवादावर नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारा, मराठा या समाज समूहांना भारतीय जनता पक्षाशी जोडले. त्यामुळे भाजप सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. राज्यात सत्तापरिवर्तनाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतचे दुख बाजूला ठेवून लढाईत उतरलो आहोत. माळी समाज कष्टकरी आहे. मात्र, पुणे जिल्हय़ातील या समाजाच्या बहुतांशी जमिनी बिल्डरच्या घशात घालण्याचे काम राष्ट्रवादी नेतृत्वाने केले, असा आरोप त्यांनी केला. मेळाव्यास राज्यभरातून लोक उपस्थित होते.

Story img Loader