गेल्यावर्षीच्या ३० जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते. साखरझोपेत असलेले संपूर्ण गाव अवघ्या काही क्षणांमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला. त्यामध्ये काहींचे संपूर्ण कुटुंब गेले, तर काही घरातील कर्ते पुरूष मृत पावले. आज एक वर्ष उलटूनही याठिकाणच्या लोकांचा जीवनगाडा रूळांवर आलेला नाही. सध्या गावातील काही लोक निवारा केंद्रावर तर उर्वरित लोक आपल्या नातेवाईकांकडे विखुरले गेले आहेत. जगण्याची दिशा हरविलेले माळीणचे गावकरी पाहिले की दुर्घटनेनंतर शासनाने पीडितांच्या पुनर्वसनाच्या केलेल्या घोषणा किती पोकळ होत्या हे दिसून येते.
दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत पदोपदी माळीणच्या गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. सुरूवातीच्या काळात निवारा, कुटुंब आणि रोजगाराची साधने हरविलेल्या गावकऱ्यांच्या हातात करायला काहीच काम नव्हते. दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांची माळीण गावापासून जवळच असलेल्या माळीण फाट्यावर निवारा केंद्रात राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी असलेल्या मर्यादित जागेमुळे गावकऱ्यांच्या पशुपालनावर गदा आली आहे. दरड कोसळण्यापूर्वी गावातील प्रत्येक घरात गाय, म्हैस, बैल किंवा शेळ्या यापैकी एखादे जनावर पाळले जात असे. त्यामुळे पूर्वी शेती वगळता जनावरे चरण्यासाठी घेऊन जाणे किंवा त्यांच्यासाठी चारा गोळा करणे अशी कामे पूर्णपणे बंद झाली आहेत. सध्या शेतीच्या कामांमुळे गावकऱ्यांना काहीप्रमाणात रोजगार असला तरी वर्षभरातील उरलेल्या काळात काय करायचे हा प्रश्न गावकऱ्यांसमोर आ वासूनच उभा आहे.
रोजगारानंतर घरांबाबत बोलायचे झाल्यास त्याबाबतही शासनाचा कारभार धीम्या गतीने सुरू आहे. प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार माळीणजवळ असलेल्या आमडे येथील आठ एकर जागेवर प्रत्येकी किमान ४९१ चौरस फुटांचे घर दिले जाणे अपेक्षित आहे. मात्र, अजूनही जागानिश्चिती आणि गृहनिर्माण संस्था स्थापनेच्या वादामुळे हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. संस्था स्थापन झाल्यावर प्रत्येक घरासाठी दोन लाख रुपये याप्रमाणे सर्व मंजूर घरांचा निधी संस्थेच्या नावे बँकेत जमा केला जाणार आहे. मात्र, सध्याच्या महागाईच्या जमान्यात दोन लाख रुपयांत घर बांधणे शक्य नाही. त्यामुळे संस्थेला दिलेले पैसे संपल्यानंतर आम्ही काय करायचे, असा प्रश्न काही ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यामुळे ग्रामस्थ या संस्थेमध्ये सहभागी होण्यास कचरत आहेत. तर काही गावकरी ‘कोठेही द्या; पण तातडीने घर द्या,’ अशी मागणी करीत आहेत. याशिवाय, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणानुसार आमडे गावातील जागाही माळीणप्रमाणे धोकादायक आहे. याठिकाणची जमीन खूप खोल खोदली तरी माती आणि मुरूमच लागतो. त्यामुळे येथे घरे बांधणे धोकादायक आहे, असे जीएसआयच्या काही लोकांनी आपल्याला सांगितल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जर ड्रॉ पद्धतीने घरांचे वाटप झाले, तर शेजारी एकमेकांपासून दुरावतील आणि लोक वेगवेगळे राहू शकणार नाहीत, अशा स्वरूपाच्या शंका व भीती माळीण ग्रामस्थ मांडत आहेत.
दरम्यान, ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली तो संपूर्ण परिसर निर्मनुष्य झालेला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले कौलारू घरांचे माळीण आता भकास झालेले दिसते. जिल्हा परिषदेची बंद पडलेली शाळा, अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेली दोन घरे आणि सभोवताल गवत वाढलेला निर्मनुष्य परिसर एवढेच काय, ते माळीणचे अवशेष उरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malin landslide after one year