माळीण दुर्घटनेचा शनिवारी ४ था दिवस. सलग तीन दिवस संततधार धरलेल्या पावसाने आज मात्र कृपा केली. ढिगारा उपसून मृतदेह शोधण्याच्या कामाला आज वेग आला. मात्र आज ढिगारे उपसता उपसता एनडीआरएफचे जवान मुख्य वस्तीजवळ येऊन पोहोचल्याने घरांच्या खाणाखुणा दिसू लागल्या. या दुर्घटनेतून वाचलेल्यांना आता चार दिवसांपूर्वीची जितीजागती वस्ती डोळ्यांसमोर तरळू लागली. आणि समोर मात्र सारे काही उद्ध्वस्त झालेले होते. घरांमधील काही ओळखीच्या चीजवस्तू दिसू लागल्या अन् मग मात्र माळीणवासियांच्या मनाचे बांध फुटले. वातावरण एकदम गंभीर झाले.
मातीचा ढीग हलविताना शनिवारी एनडीआरएफच्या जवानांना अवघे १० मृतदेह काढण्यात यश मिळाले. आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेल्या मृतांची संख्या ८२ वर गेली आहे. आता मुख्य वस्तीचे उत्खनन सुरू झाले आहे. अनेक कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहून सर्वाचे मन हेलावून गेले. घरांमधील धान्याच्या कणगी, भांडी, फोटो आणि जीवनोपयोगी वस्तूं उत्खननात दिसू लागल्याने स्वाभाविकच अनेकांचे डोळे पाणावले. हे उत्खनन आणखी तीन दिवस सुरू राहणार आहे.
दरम्यान, ढीग उपसण्याचे काम एनडीआरएफचे जवान करीत आहेत, तर पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताची जबाबदारी आहे. रोज येणारे मंत्री, राजकीय नेते व पदाधिकारी यांच्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत असून, व्हीआयपींच्या बंदोबस्तामुळे ते हैराण झालेआहेत.
एनडीआरएफ जवानांनी माळीण गावातील मुख्य वस्तीवरील माती उपसण्याच्या कामाला सुरुवात आज केली. दुर्घटनेच्या चौथा दिवस असल्याने, मातीचे ढिगारे हलवताना आता खूपच दरुगधी पसरत आहे. तीन किलोमीटरवरील अडीवरे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ही दरुगधी येऊ लागली आहे.
आज काम सुरू झालेला भाग बहुसंख्य घरे असलेला आहे. पाऊस कमी झाल्याने मातीचा थर घट्ट बनू लागला आहे. त्यामुळे जेसीबी यंत्रे वापरूनही ढिगारा उपसण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत आहेत. काही भाग मोकळा झाल्याने पोकलेन मशिनची संख्या वाढविण्यात आली आहे. मृतदेह कुजल्याने त्यांचे शवविच्छेदन जागेवरच करून त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ‘आणखी २ ते ३ दिवस ढिगारा उपसण्यास लागतील,’ असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader