नावीन्यपूर्ण व जनहिताचे उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या मलकापूर नगरपंचायतीने महिलांसाठी उभारलेले श्रीमती प्रेमलाताई चव्हाण वुमन्स फॅसिलिटी सेंटर महिलांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून महिला सबलीकरणाचे कार्य खऱ्या अर्थाने साधले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कराडनजीकच्या आगाशिवनगर येथील गणेश कॉलनीमध्ये ९० लाख रुपये खर्चून मलकापूर नगरपंचायतीतर्फे बांधण्यात आलेल्या श्रीमती प्रेमलाताई चव्हाण वुमन्स फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. राज्याचे परिवहनमंत्री मधुकर चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील, कार्यक्रमाचे निमंत्रक व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगराध्यक्ष शारदा खिलारे, मुख्याधिकारी हेमंत निकम उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, की मनोहर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सातारा जिल्हय़ातील महिलांचे पहिले स्वतंत्र व्यासपीठ निर्माण झाले आहे. शिंदे यांना मलकापूरच्या विकासाची तळमळ असून, नजीकच्या काळात मलकापूर वैशिष्टय़पूर्ण शहर म्हणून निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मलकापूरला निधींची कमतरता भासू देणार नसल्याचे ते म्हणाले.
शिंदे म्हणाले, की महिलांसाठी नावीन्यपूर्ण व कलात्मक वास्तू बांधण्याचे निवडणुकीत दिलेले आश्वासन आज पूर्ण झाले आहे. २० गुंठय़ांमध्ये ९० लाख रुपये खर्चून ही सुसज्ज इमारत उभारली आहे. त्यामध्ये महिलांसाठी वाचनालय, लायब्ररी, गौरीगणपती, दुर्गोत्सव सण साजरे करण्यासाठी व  सभा, बैठकांसाठी स्वतंत्र सभागृह, बचतगटांनी बनवलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र, विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी ओपन थिएटर तसेच नागरिकांना फिरण्यासाठी बगिचा आदी सुविधा आहेत. प्रभाग क्रमांक दोन व चार मध्येही अशा वस्तू उभारणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.