निवडणुकीच्या काळात प्रचारांना अन् सभांना रंग चढत असून विविध पक्षांकडून जाहीरनामेही सादर केले जात आहे. मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक असताना आज महायुती आणि महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध कऱण्याकरता खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्रात आले होते. संजय राऊत, मल्लिकार्जुन खरगे आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा सादर करण्यात आला. यावेळी खरगे यांनी माध्यमांशी मराठीतून संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मल्लिकार्जुन खरगे जाहीरनाम्यातील तरतुदी वाचून दाखवत होते. मतदारांसाठी केलेल्या योजनांचा आणि त्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदी मल्लिकार्जुन खरगे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितल्या. यावेळी त्यांना समर्थ रामदासांचा एक श्लोक पुसटसा आठवला. पण तो श्लोक त्यांना व्यवस्थित घेता आली नाही. त्यांच्या शेजारीच संजय राऊत बसले होते. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे ते संपादक. मल्लिकार्जुन खरगे यांना समर्थ रामदासांचा श्लोक व्यवस्थित आठवेना म्हटल्यावर संजय राऊतही बुचकळ्यात पडले. “वाळुचे रगडिता….” असं म्हणत खरगे प्रश्नार्थक झाले. बाजूलाच बसलेल्या संजय राऊतांनाही हा श्लोक नीट आठवला नाही. तेही ओठांवर हात ठेवून खरगेंच्या दिशेने काहीतरी पुटपुटले. परंतु, तरीही मल्लिकार्जून खरगे यांना त्या श्लोकमधील ओळींची जुळवाजुळव करता येईना. अखेर सारवासारव करत ते म्हणाले, “संत तुकारामांनी वाळू रडगून तेल काढणे साध्य असल्याचं सांगितलंय, मग या पाच गॅरंटी द्यायला आमच्याकडे शक्ती नाही?” असं ते म्हणाले.

दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांना म्हणायची असलेली ओवी ही संत तुकारामांची नसून समर्थ रामदासांची होती. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी ती ओवी आहे.

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

१) महालक्षी योजनानुसार महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार

२) महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार

३) ६ गॅस सिलिंडर प्रत्येकी ५०० रुपयांत उपलब्ध करून देणार

४) महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार

५) महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये २ दिवसांची ऐच्छिक रजा देणार

६) जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, १८ वर्षांनंतर लाख रुपये देणार

७) सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना ४ हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार

८) शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge in marathi samartha ramdas swami ovi sanjay raut clueless in maharashtra softnews sgk