सावंतवाडी : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या गुन्ह्यात परमेश्वर रामनरेश यादव (रा. मिर्झापूर उत्तरप्रदेश) याला अटक केली असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. परमेश्वर यादव याने पुतळ्याचे वेल्डिंगचे काम केले होते. या प्रकरणात आता यादव याला अटक झाल्याने या गुन्ह्यातील आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणात चेतन पाटील आणि जयदीप आपटे याला अटक करण्यात आली असून हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आज तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कणकवलीचे पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव हे करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.