देशभरात आज रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ संपूर्ण आयुष्यभर बहिणीची रक्षा करणार असल्याचे वचन देतो. या सणामुळे बहीण-भावाच्या नात्यात सलोखा आणि स्नेह निर्माण होतो. आजच्या या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधली आणि हा सण साजरा केला. ममता बॅनर्जी यांनी यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनाही राखी बांधली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाप्रणित एनडीएच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची उद्या आणि परवा (३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर) मुंबईत बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या आहेत. बैठकीच्या एक दिवस आधीच त्या मुंबईत पोहोचल्या आहेत. आज दुपारी त्यांनी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची ‘जलसा’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बच्चन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली. तिथे त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना राखी बांधली.
दरम्यान, दुपारी अमिताभ यांच्या घरून निघाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ममता बॅनर्जी यांना पत्रकारांनी विचारलं, केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत कमी केली आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? या प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, किंमत कमी केली परंतु, आधी ती किती वाढवली होती ते माहिती आहे ना? त्यांनी आधी मोठ्या प्रमाणात किंमत वाढवली आणि आत्ता निवडणूक आल्यावर त्यात थोडी कपात केली. त्यांनी गॅसची किंमत ८०० रुपयांनी वाढवली आणि आता २०० रुपयांनी कमी केली आहे.