तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी इथल्या उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना बंगाल ग्लोबल बिझनेस समिटला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देणार आहेत. मात्र, त्याहीपेक्षा ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या बैठकीची जोरदार चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात घडू लागली आहे. नुकतीच ममता बॅनर्जी यांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई भेटीदरम्यान ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार असल्यामुळे त्यावरून राजकीय तर्क लढवले जाऊ लागले आहेत.
ममता बॅनर्जी एकूण तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. आजपासूनच या दौऱ्याला सुरुवात झाली असून या तीन दिवसांमध्ये ममता बॅनर्जी इथल्या उद्योगपतींना भेटून त्यांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या बंगाल बिझनेस समिटचं निमंत्रण देणार आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनामध्ये असल्याची माहिती मिळते आहे.
सिल्व्हर ओकवर होणार दोन दिग्गजांमध्ये चर्चा
दरम्यान, ममता बॅनर्जी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची ‘सदिच्छा भेट’ घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. मात्र, दोन पक्षांचे अध्यक्ष आणि त्यातही दोन्ही महत्त्वाचे विरोधीपक्ष असताना या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होणार नाही, ही बाब राजकीय विश्लेषकांकडून नाकारली जात आहे. त्यामुळे या भेटीमध्ये कोणत्या नवीन समीकरणांवर चर्चा होणार, यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही घेतली भेट
नुकतीच ममता बॅनर्जी यांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीची एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे ममता बॅनर्जी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना न भेटताच परतल्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती. तृणमूल आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेल्याचंच हे द्योतक असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत भेट नाही?
ममता बॅनर्जी यांच्या नियोजित मुंबई दौऱ्यामध्ये शरद पवार यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भेट देखील ठरली आहे. मात्र, या दोघांमध्ये भेट होणार नसल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळेच उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यात भेट होऊ शकणार नसल्याचं सांगितलं जात आहे.