अहिल्यानगरःमुरूम वाहतूक करताना पकडलेले डंपर सोडण्यासाठी पाथर्डी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याच्या नावाने लाचेची मागणी करणाऱ्या अभिषेक दत्तात्रय जगताप (रा. शास्त्रीनगर, शेवगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. त्याच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या मालकीचा डंपर मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करताना दोन वर्षांपूर्वी, ३० जुलै २०२३ रोजी शेवगाव पोलिसांनी पकडून पुढील कारवाई करण्यासाठी शेवगावच्या तहसीलदारांकडे दिला होता. शेवगाव तहसीलदारांनी या वाहनाला २ लाख ३६ हजार ३०० रुपयांचा दंड आकारला. नंतर हा डंपर शेवगाव तहसीलदारांनी लिलावात काढल्याने तक्रारदाराने २५ मार्च २०२५ रोजी दंडाची रक्कम तक्रारदाराने चलनाद्वारे भरली.
त्यामुळे शेवगाव तहसीलदारांनी डंपर सोडण्याचा आदेश होण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिले. डंपर वाहन सोडण्याच्या अंतिम आदेशाचे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. हा आदेश होण्यासाठी खासगी व्यक्ती अभिषेक दत्तात्रय जगताप याने उपविभागीय कार्यालयातील लिपिक ‘मोडसे मॅडम’ यांच्यासाठी ७५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ४ एप्रिलला या लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ७ हजार रुपयांपैकी ३ हजार रुपये अभिषेक जगताप याने लगेच स्वीकारले. त्याचवेळी पथकाने त्याला पकडले. त्याच्याविरुध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्हाट यांनी ही कारवाई केली.