जालना – दोन तलवारींनी केक कापून वाढदिवस साजरा करणारास पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दोन धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे, तलवारी बाळगणारांची माहिती घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज जाधव यांचे एक पथक तयार केले आहे.
जालना तालुक्यातील पोखरी सिंदखेड गावातील वैजनाथ बंडूअप्पा परळकर (३४) याने त्याच्या वाढदिवशी दोन तलवारींनी केक कापल्याची माहिती गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळून दोन धारदार तलवारी जप्त केल्या. उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरन तालुका जालना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. कांही दिवसांपूर्वीच चंदनझिरा पोलिसांनी जालना शहरातील नॅशनलनगर भागात एका ४५ वर्षाच्या व्यक्तीजवळून ९ धारदार तलवारी जप्त केल्या होत्या.
उपनिरीक्षक सचिन सानप आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. खालेदबीन मोहम्मद बासर (रा. कुच्चरओटा) हा धारदार तलवारी घेऊन नॅशनलनगरच्या रस्त्याने जाणार असल्याचे पोलिसांना समजले होते. पोत्यामध्ये असलल्या नऊ धारदार तलवारी दुचाकीला बांधून घेऊन जाताना पोलिसांनी त्यास पकडले. २७ हजार रुपये किमतीच्या नऊ तलवारी आणि २० हजार रुपयेे किंमतीची दुचाकी पोलिसांनी याप्रकरणात जप्त केली.