कामोठे येथे पिस्तुलाच्या धाकावर व्याजाची रक्कम वसूल करणाऱ्या संशयित आरोपी विवेक चंद्रकांत भांगरे याला कामोठे पोलिसांनी दोन पिस्तुलांसह अटक केली आहे. भांगरे हा गेल्या चार वर्षांपासून कामोठे वसाहतीमध्ये व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. भांगरेकडून परदेशी बनावटीच्या दोन पिस्तुलांसह ११ काडतुसे जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी दिली.
अंकुश झा यांनी भांगरेकडून ३ लाख रुपये घेतले होते. झा यांनी भांगरेकडून घेतलेली रक्कम वेळेत परत न केल्याने गेल्या आठवडय़ात भांगरेने झा यांना पिस्तुलाच्या धाकाने धमकावले होते. झा यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतल्यावर सहायक पोलीस निरीक्षक पराग सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक सचिन जगताप यांच्या पथकाने भांगरेला ताब्यात घेतले. भांगरेच्या अंगझडतीमध्ये दोन विविध रचनेची पिस्तुले, ब्लॅकबेरी मोबाइल, अकरा काडतुसे पोलिसांना सापडली.
२००६ मध्ये रबाळे पोलिसांनी भांगरेला खुनाच्या गुन्हय़ात अटक केली होती. सुतार व गवारे या दोन टोळींच्या वादात राकेश म्हात्रे याचा खून त्या वेळी झाला होता. या खुनाच्या गुन्ह्य़ानंतर भांगरे याने कामोठे येथे आपले प्रस्थ जमवून तेथील व्यापाऱ्यांना व्याजाने रक्कम देण्याचा धंदा सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. कामोठे पोलीस यांनी भांगरेकडील इनोव्हा मोटारीचा आणि त्याच्या पैसे व्याजाने देण्याच्या धंद्यामध्ये भागीदारांचा शोध घेत असल्याचे सांगितले. भांगरेला न्यायालयाने शुक्रवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पिस्तुलाच्या धाकावर वसुली करणारा अटकेत
कामोठे येथे पिस्तुलाच्या धाकावर व्याजाची रक्कम वसूल करणाऱ्या संशयित आरोपी विवेक चंद्रकांत भांगरे याला कामोठे पोलिसांनी दोन पिस्तुलांसह अटक केली आहे.
First published on: 09-12-2014 at 12:03 IST
TOPICSपिस्तूल
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for using pistol for threatening to recover money