सातारा : समाज माध्यमावर पाकिस्तानचा झेंडा मिरवत भारत देशाबद्दल अपशब्दांचा वापर केल्याबद्दल साताऱ्यात गुरुवारी रात्री एकाला अटक केली. साताऱ्यातील वाईतील जांभळी येथील ही घटना आहे. शुभम कांबळे (वय २३) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित शुभमच्या मित्र यादीतील काहींच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर शुभमला वाई पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.
वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हा जांभळी येथील रहिवाशी आहे. त्याने त्याच्या समाज माध्यमावर टीपू सुलतान, औरंगजेबच्या उदात्तीकरण करणारी छायाचित्रे झळकवली, पाकिस्तानचा झेंडा लावत त्या देशाबद्दल कौतुक करत भारताबद्दल अपशब्द असलेला मजकूर लिहिला होता. हा प्रकार लक्षात येताच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यावर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वाई पोलिसांनी शुभमला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे अधिक तपास करत आहेत.