मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सरोटी गावात उपोषणाला बसले आहेत. मागील अकरा दिवसांपासून त्यांनी अन्नाचा कणही खाल्ला नसल्याने त्यांची प्रकृती खालावत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, यासाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका वकिलाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
मारुती भाऊसाहेब वाडेकर असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या मागण्या मंजूर कराव्या, या मागणीसाठी त्यांनी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ‘मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या.
हेही वाचा- “मी मेलो तरी…”; मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, मित्राने सांगितला भयावह घटनाक्रम
जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मागील ११ दिवसांपासून शांतीपूर्वक आमरण उपोषण सुरू आहे. मात्र अद्याप प्रशासनाच्या वतीने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने संतप्त झालेल्या मारुती भाऊसाहेब वाडेकर यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, तालुका जालना पोलिसांनी ॲड. मारुती वाडेकर यांना ताब्यात घेतलं असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा- “एका दिवसात सरकार बदलू शकतं, मग…”, मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी आलेल्या तरुणीचा संताप
आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर मारुती वाडेकर म्हणाले, “मनोज जरांगे पाटील हे मागील अकरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर आम्ही काय करायचं? आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी लाठीहल्ला करत वयोवृद्ध माणसं आणि महिलांची डोकी फोडली आहेत. त्यामुळे पोलिसांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत, ही आमची मागणी आहे. जरांगे पाटील यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावं, यासाठी प्रशासनाने मदत करावी. अन्यथा आम्ही आमचे लढे सुरूच ठेवू. जरांगे पाटलांना जर काही झालं आणि महाराष्ट्र पेटला तर त्याला कुणीही विझवू शकणार नाही.”