सोलापूर : भारतीय नौदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात बेरोजगार तरुणांच्या पालकांना ३५ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कोल्हापुरातील एका भामट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत विष्णू राजाराम पोळ (वय ५३, रा. घेरडी, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील आरोपी हा मूळचा सांगोला तालुक्यातील पोळ यांच्याच गावी राहणार असून गेल्या काही वर्षांपासून तो कोल्हापुरात राहतो. ओळखीतून त्याने पोळ यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या दोन्ही मुलांना भारतीय नौदलात नोकरीस लावतो, नौदलातील काही वरिष्ठ अधिकारी आपल्या ओळखीचे आहेत. त्यांच्या वशिल्याने बेरोजगार तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याने पोळ यांच्या मुलास नोकरी लावण्यासाठी पाच लाख ६० हजार रुपये घेतले. सुरेश वामन कोकाटे, रावसाहेब विष्णू सुरवसे, संजय बंडा मुळे यांच्याकडूनही आरोपीने १३ लाख ५० हजार रुपये घेतले. तसेच गावातील सचिन सूर्यवंशी आणि करण सूर्यवंशी या बेरोजगार तरुणांकडूनही नोकरीसाठी पैसे घेतले. एकूण सात बेरोजगार तरुणांच्या पालकांकडून ३५ आख ६० हजार रुपये घेतले. २० ऑक्टोबर २०२१ ते १३ एप्रिल २०२४ या कालावधीत हा व्यवहार झाला.

हेही वाचा…विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मनुष्यबळ पुरवठा करणारा ठेका रद्द; तक्रारींनंतर मंदिर समितीकडून कारवाई

तथापि, आरोपीने यापैकी कोणालाही भारतीय नौदलात ठरल्याप्रमाणे नोकरी लावली नाही. त्यामुळे घेतलेले पैसे परत मागितले असता तो टाळाटाळ करू लागला. तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे दिसून येताच अखेर त्याच्याविरुद्ध पोलिसांत धाव घेण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man cheated seven unemployed people by luring them with navy jobs sud 02