लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : दिवसरात्र राबूनही मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च झेपत नसल्यामुळे वैफाल्यग्रस्त झालेल्या अभागी पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगोला शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हरिश्चंद्र सुभाष दौंडे (वय ५२) असे आत्महत्याग्रस्त पित्याचे नाव आहे. यासंदर्भात त्यांचे नातेवाईक महेश दत्तात्रेय बोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

आणखी वाचा-शरद पवारांची नरेंद्र मोदींना ‘ही’ विनंती; म्हणाले, “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी…”!

मृत हरिश्चंद्र यांचा मुलगा ज्ञानमूर्ती हा बारामती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस तर मुलगी संजोत पुण्यात विधी पदवीचे (एलएलबी) शिक्षण घेत आहे. हरिश्चंद्र हे एका बँकेत शिपाईपदावर सेवेत होते. दिवसा बँकेत आणि रात्री एका पेट्रोल पंपावर रखवालदाराची नोकरी करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च भागविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करूनही त्यांना आर्थिक विवंचना सतावत होती. यातूनच त्यांची अस्वस्थता वाढली होती. गेल्या १५ दिवसांपासून ते खूप तणावाखाली होते. याच कारणातून त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.

दरम्यान, रात्री पत्नी मनीषा सांगोला शहरात कोष्टी गल्लीत माहेरी गेल्या असता हरिश्चंद्र यांनी घरात छताच्या विद्युत पंख्याला सुताच्या दोरीने गळफास लावून घेतला. पत्नी परतल्यानंतरच हा धक्कादायक प्रकार उजेडात आला.