अलिबाग: मुंबई गेटवे येथून मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी समुद्रात पडल्याची घटना घडली. प्रशांत कांबळे असे या प्रवाशांचे नाव असून त्याला पोहता येत असल्याने तो बचावला आहे. मात्र या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
प्रशांत कांबळे हे सकाळी नऊ वाजताच्या अजंठा बोटीने गेटवे येथून मांडवाकडे निघाला होते. बोटीतील फळी अचानक तुटली आणि प्रशांत थेट समुद्रात कोसळले. बोटीतून दोर टाकून त्यांनी वाचवण्यात आले. या दुर्घटनेनंतर जलप्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण यापूर्वीही बोटींना समुद्रात लहान मोठय़ा दुर्घटना घडल्या आहेत. दरम्यान बोटीच्या कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला त्या ठिकाणी उभे राहू नका असे सांगितले होते. मात्र प्रशांत यांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि काही वेळाने ही दुर्घटना घडली. स्वत:च्या चुकीमुळे समुद्रात पडल्याचे प्रशांत यांनी सांगितल्याने याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र मेरिटाइम बोर्डाकडून या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या बोटींची सुरक्षा तपासणी करावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.