रत्नागिरी : दापोली तालुक्यातील एका बालिकेवर अत्याचारप्रकरणी स्वप्निल माने या २५ वर्षीय तरुणाला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आठ वर्षांची ही बालिका २८ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता शिकवणीला गेली होती. ती नैसर्गिक विधीसाठी गेली असता शिकवणी घेणाऱ्या महिलेच्या दीराने ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर ही मुलगी परत शिकवणीला आली तेव्हा तेथील मुलांनी तिच्या पायावरील रक्ताचे डाग पाहिल्यावर तिला लागले असल्याचे शिकवणी घेणाऱ्या बाईंना सांगितले. मात्र त्यांना वेगळी शंका आल्याने त्यांनी तिला घरी नेऊन पालकांच्या ताब्यात दिले. मात्र या मुलीच्या वेदना थांबत नसल्याने पालकांनी तिच्याकडे चौकशी केली असता या बालिकेने झालेला प्रकार सांगितला. त्यामुळे तिला उपचारांसाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रात्री उशिरा दापोली पोलीस ठाण्यात या मुलीच्या पालकांनी संशयित माने याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच पुढील तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊन माने याला बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६ नुसार दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांनी केला. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मृणाल जाडकर यांनी काम पहिले. दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अंमलदार हेडकॉन्स्टेबल एस. बी. गायकवाड यांनी न्यायालयात काम पहिले.