“जो व्यक्ती दुसऱ्यासाठी खड्डा खणतो, तो व्यक्ती स्वतः खणलेल्या खड्ड्यात पडतो”, अशी म्हण प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात ही म्हणीप्रमाणे एक घटना घडली आहे. आपल्या मित्राची हत्या करुन त्याचा मृतदेह आंबोली घाटातील दरीत फेकत असताना खून करणाऱ्याचा पाय घसरला आणि तोही दरीत पडला. दरीत पडल्यानंतर खून करणाऱ्याचाही मृत्यू झाला. या अजब घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत. सुशांत खिल्लारे (वय ३०) याची मारहाण करुन हत्या केल्यानंतर भाऊसो माने आणि त्याचा मित्र तुषार पवार (वय २८) हे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात आले. घाटाच सुशांतचा मृतदेह दरीत फेकत असताना भाऊसो माने यांचा पाय घसरला आणि तेही मृतदेहासह दरीत कोसळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाऊसो माने दरीत पडल्यानंतर तुषार पवार घाबरला आणि त्याने पोलिसांना फोन करुन भाऊसो माने दरीत पडल्याचे सांगितले. पोलिसांनी दरीत शोधाशोध घेतल्यानंतर त्यांना भाऊसो माने यांचा मृतदेह सापडलाच. पण त्याच्यासोबतच पोलिसांना दुसराही मृतदेह सापडला. त्यामुळे पोलिसही चक्रावले. त्यांना तुषार पवारचा संशय आला आणि पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तुषार पवारने सर्व सत्य सांगितले.

प्रकरण काय आहे?

ज्याचा खून झाला तो सुशांत खिल्लारे हा पंढरपूर येथे राहणारा आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथे राहणाऱ्या आरोपी भाऊसो माने याने विटभट्टीसाठी कामगार पुरविण्याकरिता सुशांतला तीन लाख रुपये दिले होते. ते पैसे परत देण्यास सुशांत टाळाटाळ करत होता. त्यामुळे भाऊसो माने आणि त्याचा मित्र तुषार पवारने सुशांतला धडा शिकवण्याचे ठरविले. पंढरपूर येथे जाऊन सुशांतला कामानिमित्त बोलावून घेतले आणि तिथून त्याला कराड येथे आणण्यात आले. तिथे दहा दिवस माने यांच्या घरात सुशांतला बंदी बनवून ठेवले. २९ जानेवारी रोजी रविवारी दारूच्या नशेत सुशांतला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर माने आणि पवार या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जवळपास २०० किमी दूर असलेल्या आंबोली घाटात जाण्याचे ठरविले.

आंबोली घाटात एकेठिकाणी मृतदेह फेकण्यासाठी भाऊसो माने आणि तुषार थांबले. मात्र मृतदेह फेकताना भाऊसो माने यांचा तोल गेला आणि ते देखील मृतदेहासोबत दरीत कोसळले. तुषार पवार तेव्हा गाडीसोबतच थांबला होता. सदर घटना घडल्यानंतर घाबरलेल्या तुषारने कराडला घरी फोन लावून घडलेला प्रसंग सांगितला. माने आणि पवार हे लहानपणीचे मित्र असून त्यांना वीटभट्टी सुरु करायची होती. त्यातून त्यांनी सुशांतला पैसे दिले. मात्र सुशांतने फसवणूक केल्यामुळे हे प्रकरण घडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

सुशांत खिल्लारेचा खून सातारामधील कराड येथे झाल्यामुळे आता हे प्रकरण कराड पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार पवार याचीही चौकशी सुरु असून त्यानंतर आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे कळू शकेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man killed friend and died when tried to dispose body in amboli ghat sindhudurg kvg