कराड : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला वीस वर्षे कारावास आणि दीड लाख रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्या. के. एस. होरे यांनी ठोठावली. रोहित रमेश थोरात असे शिक्षा झालेल्या तरुणाच्या नाव आहे. पाटण तालुक्यातील एका गावात २०२२ मध्ये ही घटना घडली होती. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी शाळेत गेलेली साडेपंधरा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. आणि तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर तशी तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी रोहित थोरात व त्या मुलीला शोध घेण्याचा प्रयत्न केला. रोहित थोरात बारामती भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे जाऊन त्याला अटक केली.
हेही वाचा >>> कराड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून ढकलून खून
रोहित थोरातने संबंधित पीडित मुलीसोबत मैत्री करून तिला पळवून नेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पीडित मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी ज्वेलर्सच्या दुकानात विकून ते पुणे येथे गेले. त्यानंतर सासवड येथे पोलिसांनी त्यांना पकडले. यावर रोहित थोरातविरोधात बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अन्य गुन्हे दाखल झाले होते. या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात पूर्ण झाली. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. शिक्षेवरील युक्तिवादासह तपासी अधिकारी फौजदार एम. एस. तलबार, ज्वेलर्स दुकान मालकाच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश होरे यांनी रोहित थोरातला दोषी धरून वेगवेगळ्या कलमांन्वये २० वर्षे सश्रम कारावास व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून ७५ हजारांची नुकसानभरपाई पीडित मुलीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.