सोलापूर : पत्नीला सासरी पाठवत नाही, पत्नीने न्यायालयात दाखल केलेला दावा काढून घेत नाही म्हणून चिडून जावयाने सासरा, सासू आणि मेव्हण्यावर प्राणघातक सशस्त्र हल्ला केला. यात सासऱ्याचा मृत्यू झाला. तर सासू व मेव्हणा दोघेही गंभीर जखमी झाले. मोहोळ तालुक्यातील राम हिंगणी गावात मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला.
बापूराव तुळशीराम मासाळ (वय ५२) असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. तर सासू आशा (वय ४५) आणि मेव्हणा अभिषेक मासाळ (वय २४) या दोघा जखमींना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. गुन्हा घडल्यानंतर जावयाने पलायन केले आहे. त्याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी अभिषेक मासाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची बहीण निशा (वय २५) हिचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. परंतु, पुढे एका वर्षात पतीने तिचा पैसे आणि इतर किरकोळ कारणांवरून छळ सुरू केला होता. त्यामुळे कंटाळून ती माहेरी निघून आली होती. तिचा दोन वर्षांचा मुलगा मानस हा त्याच्या वडिलांकडे आहे. इकडे निशा हिने न्यायालयात दावा दाखल केला होता.
दरम्यान, गेल्या वर्षी पतीने निशा हिच्या माहेरी येऊन तिला मारहाण केली होती. निशा ही माहेरी असताना तिचा पती मध्यरात्री उशिरा सासरी आला. त्यावेळी सासू-सासरे दोघे घराच्या ओसरीत झोपले होते. तर मेव्हणा अभिषेक हा शेजारच्या गोठ्यात आणि पत्नी निशा ही घरातील खोलीत झोपली होती. जावयाने झोपलेल्या सासू-सासरे यांच्यावर चाकूने सपासप वार केला. त्यावेळी आरडाओरडा ऐकून मेव्हणा अभिषेक झोपेतून उठून धावत आला असता त्याच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. सासरे बापूराव यांच्या छातीवर, पोटावर, बरगडीवर, मांडीवर वार झाल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. सासू आशा आणि मेव्हणा अभिषेक हे गंभीर जखमी झाले.