एकतर्फी प्रेमातून एका तरुणीसह तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केलेल्या राकेश धोंडू सोडये (वय २५, रा. उन्हाळे, ता. राजापूर) या तरुणाची प्रकृती अजून गंभीर असून, त्याच्यावर कोल्हापूरच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  राजापूर शहरातील आंबेवाडी येथील प्रकाश लोळगे यांच्या घरी राकेश काल दुपारी गेला आणि त्यांची मुलगी प्रियंका हिला लग्नाविषयी विचारणा केली. तिने नकार देताच राकेशने बॅगेतील चाकू काढून प्रियंकासह तिची आई प्रभावती, बहीण पूनम आणि वहिनी अमृता अविनाश लोळगे यांच्यावर वार केले. त्या पाठोपाठ त्याने स्वत:च्याही हातावर आणि पोटावर वार करून घेतले. त्यामुळे तो तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. अन्य जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी प्रियंका आणि प्रभावती यांना पुढील उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दरम्यान, पोलिसांनी राकेशविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र गंभीर जखमी अवस्थेत त्याला कोल्हापूरला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  जखमी प्रियंकाचा विवाह अन्य तरुणाशी ठरल्याचे समजल्यामुळे राकेशने हा अघोरी प्रकार केल्याचे सांगितले जाते. त्याने हल्ल्यामध्ये वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. अशा प्रकारे एकतर्फी प्रेमातून एकाच वेळी संबंधित तरुणीसह तिच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्याचा हा जिल्ह्य़ातील बहुधा पहिलाच प्रकार असल्यामुळे राजापूरसह जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा