चॉकलेटच्या आमिषाने आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करीत मृतदेह दरीत फेकून देणाऱ्या नराधमास कराड न्यायालयातील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी (दि. २१) फाशीची शिक्षा ठोठावली. संतोष चंद्रू थोरात (४१, रा. रूवले ता. पाटण) असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष थोरात हा २९ डिसेंबर २०२१ रोजी त्याच्या गावातीलच एका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला शेतात घेऊन गेला. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली संतोष थोरात याच्या घराच्याबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. यावेळी पीडित आठ वर्षीय मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत निर्जनस्थळी नेवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केला. तसेच मुलीचा मृतदेह दरीत फेकून दिला होता. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी तपास करत त्याला अटक केली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी सरकारी वकील राजेंद्र शहा यांचा युक्तिवाद, ढेबेवाडी पोलिसांनी सादर केलेले पुरावे व दोषारोपपत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने संतोष थोरातला दोषी धरून फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
कराड: लहान मुलीवर बलात्कार करून तिचा खुन करणाऱ्या नराधमास फाशी
पोलिसांनी सादर केलेले पुरावे व दोषारोपपत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने संतोष थोरातला दोषी धरून फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 21-07-2023 at 19:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man who raped killed minor girl gets death penalty zws