Manaoj Jarange Patil warns Eknath Shinde : “प्रकाश आंबेडकर आणि आम्ही सत्तेत नाही, मग आमच्यात कशाला भांडण लावता?” असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्यात भांडण लावू नका, तुम्ही तसा प्रयत्न केलात तर तुम्हाला हे प्रकरण अवघड जाईल”, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. “मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर व मनोज जरांगे पाटील यांनी बसून चर्चा केली पाहिजे”, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर आज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “आमच्या आमच्यात (मराठा समाज व प्रकाश आंबेडकर) गुंता निर्माण करू नका”, असं जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, “माझं सर्वांना आवाहन आहे की आरक्षणप्रणी सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी. तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मांडाव्यात. मराठा आणि इतर समाजांच्या मागण्यांवर आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. मनोज जरांगे असतील किंवा ओबीसी नेते असतील, या सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी. विवधी समाजांच्या आरक्षणाबाबतच्या मागण्यांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत आमची पहिल्या दिवसापासून जी भूमिका होती तीच आजही कायम आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे कोणीही कोणावरही आरोप अथवा टीका करू नये.”
हे ही वाचा >> CP Radhakrishnan : “चुकीच्या पक्षातील चांगला माणूस”, विरोधकांनीही कौतुक केलेले सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
आम्हाला डिवचवण्याचा प्रयत्न करू नका; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या सूचनेवर प्रतिक्रिया देताना मनेज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आम्हाला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र बसून चर्चा करायला सांगतायत. मात्र, ना आम्ही सत्तेत आहोत, ना प्रकाश आंबेडकर सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्यात चर्चा करून काय होणार आहे? उलट तुम्ही आमच्यातला गुंता वाढवत आहात. मला असं वाटतं की मुंबईतून आता आमदारांना हाकलून देण्याची वेळ आली आहे. समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही या भूमिकेवर सरकार आल्याशिवाय हा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, हे त्यांनी (सरकार) आता समजून घ्यावं. तसेच या लोकांनी विनाकारण आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. तसा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वेगळ्या दिशेने जातील.