लहान वयात मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांना नित्य वाचनाची सवय लावली जाते. त्यांच्याकडून श्लोक आणि स्तोत्र बोलून घेतले जातात. पण अलिबागच्या मनश्री आंबेतकर हिने पाठांतरासाठी चक्क भारतीय राज्यघटना निवडली. आणि बघता बघता राज्यघटनेतील सर्व कलमे, उपकलमे, दुरुस्त्या, परिशिष्ट, अनुसूच्या मुखोद्गत केल्या आहेत. त्यामुळे अलिबागची ‘संविधानकन्या’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
लहानपणापासूनच मनश्रीला वाचनाची आवड होती. नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना, भारतीय राज्यघटनेचा काही भाग तिच्या वाचनात आला. यातूनच राज्यघटनेबद्दल आणखी जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली. परीक्षा संपल्यावर तिने वडिलांकडून राज्यघटनेची एक प्रत मागून घेतली. अवघ्या काही दिवसांत तिने भारतीय संविधानाचे हे पुस्तक वाचून काढले. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानणाऱ्या मनश्रीने नंतर राज्यघटनेचे पाठांतर करण्याचा निर्णय घेतला आणि बघता बघता तो तडीस नेला. आज राज्यघटनेचे २२ भाग, २४ प्रकरणे आणि ३९५ कलमे मनश्रीने पाठ केली आहेत. ३६ मिनिटे आणि २४ सेकंदांत ती संपूर्ण राज्यघटना बोलून दाखवते. घटनेतील कोणती कलमे कशासाठी आहेत, याची माहिती क्षणार्धात देऊ शकते. राज्यघटनेत आजवर झालेल्या दुरुस्त्या, परिशिष्ट, अनुसूची कोणत्या आहेत. त्या कशासाठी आहेत. याची माहिती लागलीच देऊ शकते. यामुळे अलिबाग परिसरात ‘संविधानकन्या’ म्हणून ती नावारूपास आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील विविध संघटनांनी तिच्या या पाठांतराची नोंद घेतली आहे. आणि पुरस्कार देऊन गौरवले आहे. आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपला हा विक्रम नोंदवण्याची मनश्रीची इच्छा आहे.
घटनेच्या अभ्यासात तिला पालक आणि शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अलिबागच्या सेंट मेरी शाळेच्या प्रशासनाने मनश्रीला यासाठी विशेष अभ्यासवर्गाचे आयोजन केले आहे. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांनी शाळाबाह्य़ घटनांचा अभ्यास करणे गरजेचे असते. यातून सुजाण व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. त्यामुळेच मनश्रीच्या या उपक्रमात सहकार्य केल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मीना कोरीया सांगतात. ‘‘सुरुवातीला कुतूहल म्हणून मी राज्यघटनेचे वाचन केले. त्यानंतर मला संविधानाबद्दल आवड निर्माण झाली. यातूनच संविधानाचे पाठांतर करण्याचा विचार मनात आला. आणि सतत वाचन करून तडीस नेला,’’ असे मनश्री आंबेतकर सांगते. भारतीय लोकसेवेत करिअर करण्याची मनश्रीची इच्छा आहे. त्याचबरोबर विधिक्षेत्राची पदविका घेऊन भारतातील कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात पाठांतर ही संकल्पना अडचणीत आली आहे. दृक्श्राव्य माध्यमांच्या आक्रमणामुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. वाचनालयात रोडावणारी तरुणांची संख्या हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. मात्र मुलांना लहानपणापासून वाचनाची गोडी लावली तर त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळू शकते, वाचनातून पाठांतरची आवड निर्माण होऊ शकते. मनश्रीचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी पाठांतराची सवय लावली तर सुजाण नागरिकाचे ध्येय गाठता येईल यात शंका नाही.
अलिबागची संविधानकन्या
लहान वयात मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांना नित्य वाचनाची सवय लावली जाते.
Written by हर्षद कशाळकर
Updated:

First published on: 22-04-2016 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manashri ambetkar indian constitution