Manvat Murders : ‘मानवत मर्डर्स’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या वेबसीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम आदींच्या भूमिका आहेत. आत्मपाँम्प्लेट हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा ज्याने दिग्दर्शित केला त्या आशिष बेंडेने ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. मानवत हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला होता. हे हत्याकांड नेमकं काय होतं? जाणून घेऊ.
अंधश्रद्धेतून घडलेलं महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड
गुप्तधन आणि त्यासाठी दिला जाणारा नरबळी हा अंधश्रद्धेचा प्रकार काही महाराष्ट्राला नवा नाही. महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणा विरोधी विधेयक आणण्यासाठी आयुष्य वेचलं. तरीही अंधश्रद्धेला बळी पडून अजूनही अशा प्रकारच्या बातम्या आजही वाचायला मिळतात. मानवत हत्याकांड घडलं तो काळ तर १९७० ते १९७५ या कालावधीतला होता. संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने हादरला, शहारला. याच सत्य घटनेवर आधारित बेतली आहे मानवत मर्डर्स.
मानवत हत्याकांड नेमकं होतं काय?
१९७२ ते १९७४ या दोन वर्षांच्या कालावधीत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मानवत गावातल्या मुली आणि महिला एका मागोमाग एक गायब होऊ लागल्या. त्यानंतर काही दिवसांच्या अवधीने त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह कधी शेतात, कधी विहिरींवर, तर कधी वावरात पडू लागले. सहा हत्या होईपर्यंत यामागे कोण आहे, याचा तपास लागू शकला नव्हता. वारंवार महिला किंवा मुलगी गायब झाल्याची घटना आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह अशा पद्धतीने मिळणं यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते.
उत्तमराव बारहाते हा प्रकरणातील मुख्य आरोपी
मानवत गावात उत्तमराव बारहाते नावाची व्यक्ती राहायची. गावातल्या श्रीमंतांपैकी ते एक होता. त्याने त्यावेळी नगरपालिकेचं अध्यक्षपद भुषवलं होतं, त्यामुळे त्याच्याकडे पैसा मोठ्या प्रमाणावर होता. उत्तमराव बारहातेची नजर एका पारधी वस्तीतल्या महिलेवर पडली. या महिलेचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणी पारधी वस्तीत हातभट्टीची दारु तयार करायची आणि विकायची. रुक्मिणी उत्तमरावला इतकी आवडली की, त्याने तिच्यासाठी वेगळा वाडा बांधला होता. तिथेही रुक्मिणीने हातभट्टी लावली होती. रुक्मिणी वाड्यात राहात होती पण तिला मूल नव्हतं. गणपत सावळे नावाच्या मांत्रिकाने तिला पिंपळाच्या झाडावर मुंज्या असल्याचं सांगितलं. तसंच मुंज्याला सुंदर मुली आवडतात, तू जर मुंज्याची इच्छा पूर्ण केलीस तर तू गरोदर राहशील अशी आशा त्याने तिला दाखवली. रुक्मिणी मूल होण्यासाठी आसुसली होती. त्यामुळे मुली, महिलांचे बळी देण्याचा हा क्रूर खेळ सुरु झाला. मानवत हत्याकांडात ११ मुली आणि महिलांची हत्या झाली. ‘मानवत हत्याकांड’ या नावाने शरद देऊळगावकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात या सगळ्या हत्याकांडाचे सविस्तर उल्लेख आहेत.
शरद देऊळगावकर यांच्या पुस्तकात काय उल्लेख?
“कुणाला भ्यायचं नाही हा आपला गुण आहे. पैसा नसता तर मीपण फासावर लटकलो असतो. फक्त पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी चार माणसं फासावर चढवण्यात आली” मानवत हत्याकांड खून खटल्यातील मुख्य आरोपी उत्तमराव बारहातेची ही वाक्यं मानवत हत्याकांड या पुस्तकात शरद देऊळगावकर यांनी लिहिली आहेत. यावरुनच मुख्य गुन्हेगार हा किती निर्ढावलेला होता याची साक्ष पटते. २० नोव्हेंबर १९७५ ला बारहातेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्द केली आणि त्याची मुक्तता केली.
मानवतमध्ये कुणा कुणाचे खून पडले?
गयाबाई गच्छवे, शकीला अल्लाउद्दीन, सुगंधा मांग, नसीमा सय्यद, कलावती बोंबले, पार्वती बारहाते, आरिफाबी , हालिमा, हरीबाई बोरवणे, कमल बोरवणे, तारामती बोरवणे यांचे या हत्याकांडात खून पडले. कोडिंबा रिळे नावाच्या एका माणसाचीही हत्या झाली. ज्यानंतर रुक्मिणीच्या समिंदरी नावाच्या बहिणीला अटक करण्यात आली. ही अटक कोंडिबा रिळेच्या हत्येच्या संशयावरुन करण्यात आली होती. समिंदरीच्या अटकेनंतर गूढ उकलण्यास सुरुवात झाली.
तीन हत्या एकाच दिवशी
मानवत हत्याकांडातील शेवटचे तीन खून एकाच दिवशी झाले तो दिवस होता ४ जानेवारी १९७४ हरिबाई बोरवणे ही पस्तिशीची महिला तिच्या ९ वर्षांच्या तारामती नावाच्या मुलीसह आणि वर्षभराच्या कमलसह चालली होती. त्याचवेळी हरिबाईच्या डोक्यात कुऱ्हाड बसली. तिच्या कडेवरच्या बाळाची म्हणजेच कमलचीही हत्या करण्यात आली आणि तारामतीही हत्या करण्यात आली. उमाजी पितळे नावाच्या माणसाने हे सगळं पाहिलं. या तीन हत्यांचा एकमेव साक्षीदार हा मानवत हत्याकांडातील महत्त्वाचा दुवा ठरला.
मानवत हत्याकांडाभोवतीचा संभ्रम ५० वर्षानंतरही कायम
त्यावेळी मुंबई पोलीस उपायुक्त पदावर असलेले रमाकांत कुलकर्णी, पोलीस अधीक्षक एन. एम. वाघमारे, गुन्हे शाखेचे अधिकारी विनायक वाकटकर यांच्याकडे हे प्रकरण देण्यात आलं होतं. या प्रकरणात सोपान थोटे, शंकर काटे सहभागी होते. तर तिहेरी हत्येत दगडू, देव्या, सुकल्या यांचा सहभाग होता. शंकर काटे माफीचा साक्षीदार झाला. बाकी चार जणांना फाशीची शिक्षा झाली. पण मुख्य गुन्हेगार आणि इतर गुन्हेगारांचं काय झालं याचा संभ्रम अजूनही कायम आहे. मानवत या ठिकाणी झालेल्या या हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत त्या मानवत मर्डर्स या वेबसीरिजमुळे. आता या सीरिजमध्ये काय काय असणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे.