अकोले मांदाडे समितीचा अहवाल मराठी मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून या अहवालावर हरकती नोंदविण्याची मुदत १५ एप्रिल पर्यँय वाढविण्यात आली आहे. अकोलेचे आमदार डॉ किरण लहामटे तसेच अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीने ही मागणी केली होती.
गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपा संदर्भातील हि. ता. मेंढेगिरी यांच्या नेतृत्वाखालील गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालाचे पुनर्विलोकन करण्यासाठी नाशिक येथील मेरीचे महासंचालक प्रमोद मांदाडे यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी अभ्यास गट (२) नेमला होता. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाने या समितीचा अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता .तसेच या अहवालावर जनतेकडून १५ मार्च पर्यंत हरकती, अभिप्राय मागितले होते.मात्र संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेला हा अहवाल इंग्रजी मध्ये होता.
धरणाच्या पाण्याशी आणि पर्यायाने मुख्यतः हजारो शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असणारा हा अहवाल मराठी मध्ये न देता इंग्रजी मध्ये देण्यात आला असल्याबद्दल अनेक शेतकरी कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसाला मांदाडे समितीने केलेल्या शिफारशी समजाव्यात या साठी हा अहवाल मराठी मध्ये प्रदिद्ध करावा तसेच मराठी मध्ये तो प्रदिद्ध झाल्यानंतर आक्षेप नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीने केली होती.
अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनीही मांदाडे अभ्यासगटाचा अहवाल प्रथम मराठीत उपलब्ध करून देण्यात यावा व मगच त्यावर हरकती मागविल्या जाव्यात, हरकती मागविण्यास मुदतवाढ दिली जावी अशी मागणी विधानसभेत केली होती. व या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले होते.विधानसभा सभागृहात त्यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशन खाली तातडीची बाब म्हणून हा मुद्दा उपस्थित केला होता.या सर्वांची दखल घेत हा अहवाल आता मराठी मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच हरकती नोंदविण्यासही मुदत वाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे सचिवांनी प्राधिकरणाचा या बाबतचा निर्णय सचिव (लाक्षेवि) जलसंपदा याना पत्राद्वारे कळविला आहे.पत्रात म्हंटले आहे की “महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या जाहीर सूचनेद्वारे गोदावरी अभ्यासगट अहवाल (२०२४) मधील परिशिष्ठे १ ते ७, प्रपत्र १ ते १० आणि तक्ता क्र. ५ व ६ यावर अभिप्राय/हरकती असल्यास दि. १५ मार्च २०२५ पर्यंत प्राधिकरणास लेखी स्वरुपात किंवा ईमेल द्वारे सादर करण्याविषयी कळविले होते.
प्राधिकरणास प्राप्त अभिप्रायांनुसार सोबतच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्राधिकरणाने अभिप्राय /हरकती पाठविण्याची तारीख दि. १५ एप्रिल २०२५ वाढविण्यात आलेली आहे. तसेच, प्राधिकरणाने महासंचालक, मेरी नाशिक तथा अध्यक्ष, गोदावरी अभ्यासगट अहवाल (२०२४) यांना सदर अहवालाची मराठी प्रत उपलब्ध करुन देण्याविषयी कळविलेले आहे. सदर मराठी अहवाल प्राप्त झाल्यावर सदर अहवाल प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ठेवून त्यातील परिशिष्ठे १ ते ७, प्रपत्र १ ते १० आणि तक्ता क्र. ५ व ६ यावर अभिप्राय/हरकती मागविण्यात येतील. प्राप्त अभिप्राय/हरकती विचारात घेऊन प्राधिकरणाकडून पुढिल कार्यवाही करण्यात येईल. अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे