सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे नियोजित एमआयडीसीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विनासंमती संपादित होत असून शेतजमिनींच्या सात-बारा उता-यांवर एमआयडीसीच्या नावाची नोंद झाली आहे. त्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाकन दाखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंद्रूप ते सोलापूरमार्गे मुंबईला बैलगाडी मोर्चा सुरू केला. बुधवारी हा बोलगाडी मोर्चा सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धाडकला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी झालेली चर्चा फिसकटल्यामुळे आंदोलक शेतकरी बैलगाड्यांसह तेथेच दोन दिवसांची धरणे आंदोलन हाती घेतले आहे.
दैन दिवसांत न्याय न मिळाल्यास बैलागाडी मोर्चा पुढे मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्याकडे रवाना होणार असल्याचे आंदोलकांचे नेते महादेव गुरप्पा कुंभार यांनी जाहीर केले. दरम्यान, शासनाच्या उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर यांनी महादेव कुंभार यांना पत्र पाठवून उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या आदेशानुसार मंद्रूप औद्योगिक क्षेत्राच्या विनाअधिसूचनेचा प्रस्ताव पुढील १५ दिवसांत उच्चाधिकार समितीच्या बैठकीसमोर सादर करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु ही चर्चा फिसकटली. तेव्हा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करून धरणे आंदोलन सुरू केले.
येत्या दोन दिवसांत शासनाचे न्याय न दिल्यास शेतकऱ्यांचा बैलागाडी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार असल्याचे महादेव कुंभार यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात महिलांसह ८० शेतकरी सहभागी आहेत. त्यांच्या सोबत पाच बैलगाड्या आहेत. बैलांना चारा उपलब्ध करण्यासाठी सोबत टेम्पो भरून चारा आणि पाण्याचा टँकर घेण्यात आला आहे, दररोज २५ किलोमीटर अंतर कापून १५ दिवसांत बैलगाडी मोर्चा मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर धडक मारणार असल्याचे महादेव कुंभार यांनी सांगितले. या आंदोलनात प्रवीण कुंभार, बाबू मेंडगुदले, मलकारी जोडमोटे, गजानन शेंडगे, राम कुंभार, दयानंद म्हेत्रे, बसवराज कुंभार, बाबू शेंडगे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. सोलापुरात झालेल्या आंदोलनात प्रहार संघटनेचे नेते जमीर शेख, अजित कुलकर्णी हेही सहभागी झाले होते.