महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादबाबत धक्कादायक माहिती दिली. राज्यात लव्ह जिहादची १ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली असल्याचे लोढा यांनी सांगितले होते. यावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी यावरून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मागणी केली की, मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातल्या जनतेची माफी मागावी. आझमी म्हणाले की, “मी मागणी करतो की लोढा यांनी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांना माफी मागायला सांगा. कारण लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील अबू आझमी यांची मागणी लावून धरली.”
लोढांच्या समर्थनात गुलाबराव मैदानात
आझमी आणि आव्हाडांच्या मागणीनंतर शिवसेना आमदार गुलाबराव पाटील मैदानात आले. पाटील म्हणाले की, “ज्यांना वाटत असेल की, लव्ह जिहाद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्यांनी माझ्या गावी यावं. माझ्या गावातही अशी दोन प्रकरणं झाली आहेत. पाटील आव्हाडांना म्हणाले की, तुम्ही मुंब्र्यात राहता म्हणून बोलू नका. तुम्हाला त्यांची (मुस्लीम मतदार) गरज आहे म्हणून बोलत आहात.”
लोढांनी माफी का मागावी? : आशिष शेलार
दुसऱ्या बाजूला लोढांच्या समर्थनात आमदार आशिष शेलार मैदानात आले. शेलार म्हणाले की, “मंगलप्रभात लोढांनी माफी का मागावी? ते हिंदू भगिनींसाठी बोलले म्हणून माफी मागावी का?”
हे ही वाचा >> दिल्ली ते बिहार! लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर ईडीची छापेमारी, ‘या’ कारणामुळे कारवाई
अजित पवारांनी गदारोळ थांबवला
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा गदारोळ थांबवण्याचा प्रयत्न केला. पवार म्हणाले की, अध्यक्ष महोदय मला इतर विषयांवर बोलण्याची परवानगी द्यावी. मंगलप्रभात लोढांनी जो विषय़ मांडला तसेच जितेंद्र आव्हाड, गुलाबराव पाटील, आशिष शेलार यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातलं योग्य काय ते घ्यावं आणि अय़ोग्य गोष्टींना बाजूला काढून पुढचं कामकाज सुरू करावं.