आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केली. यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मंगेश साबळेंनी मातोश्रीच्या सांगण्यावरून गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप केला. तसेच तोडफोडीच्या आदल्या दिवशी मंगेश साबळे मातोश्रीवर मुक्कामी होते, असा दावा केला. यावर आता स्वतः मंगेश साबळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगेश साबळे म्हणाले, “नितेश राणे, निलेश राणे, नारायण राणे यांचं मराठा समाजासाठी काम खूप मोठं आहे. ते काम मी जवळून बघितलं आहे. परंतू आता त्यांनी असं बोलणं योग्य नाही. मी एक दीड वर्षांपूर्वी नितेश राणेंना भेटलो होतो. माझी त्यांच्याशी चर्चाही झाली होती. ते म्हणत आहेत की, मी मातोश्रीवर होतो, पण मी मातोश्रीवर नव्हतो.”

“मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की, मी मातोश्रीवर…”

“मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की, मी मातोश्रीवर नव्हतो. त्यांनी या गोष्टीला राजकीय वळण देऊ नये. कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा राजकीय भांडणाशी माझा संबंध नाही,” असं मत मंगेश साबळे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये, त्यामुळे आता…”; शरद पवार स्पष्टच म्हणाले….

“पोलिसांनी आमचे सर्व कॉल रेकॉर्ड्स तपासावेत”

“माझ्या मराठा समाजाचे तरुण आत्महत्या करत आहेत. सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मी हे कृत्य केलं. गुणरत्न सदावर्ते आमच्या जखमेवर मीठ टाकत आहेत. म्हणून आमच्या भावनेचा उद्रेक झाला. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित घरावर, बंगल्यावर किंवा फोनवर आमचं बोलणं झालेलं नाही. पोलिसांनी आमचे सर्व कॉल रेकॉर्ड्स तपासावेत,” असंही मंगेश साबळे यांनी नमूद केलं.

“पंतप्रधानच जाणूनबुजून काल त्यावर काही बोलले नाहीत का?”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना भाषणात त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा उल्लेखही केला नाही, असं म्हणत आता मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर कारस्थान केल्याचा आरोप केला. मनोज जरांगे म्हणाले, “परवा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण पंतप्रधानांना या दोघांनी मराठा आरक्षणाबाबत व त्यासाठीच्या आंदोलनाबाबत सांगितलं नाही अशी शंका आहे. जर त्यांनी सांगितलं असेल, तर पंतप्रधानच जाणूनबुजून काल त्यावर काही बोलले नाहीत का? पंतप्रधानांना गोरगरीबांची गरज राहिली नाही, असा अर्थ महाराष्ट्रातील जनता आता काढायला लागली आहे.”

हेही वाचा : “मला हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायचं आहे की, आता…”; गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य चर्चेत

“…तर मोदींचं विमान शिर्डीत उतरू दिलं नसतं”

“पंतप्रधान बोलले काय किंवा नाही बोलले काय, मराठ्यांना काही फरक पडत नाही. पण समाज शांत यासाठी होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील असं समाजाला वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांना हा विषय मार्गी लावण्याबाबत सांगतील असं वाटलं होतं. पंतप्रधानांच्या बाबतीत मराठ्यांच्या मनात वैरभावना नव्हती. जर तशी असती, तर पंतप्रधानांचं विमानही शिर्डीत खाली उतरू दिलं नसतं. ते वरचेवरच परत पाठवलं असतं”, असंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh sabale answer allegations of bjp mla over vandalism of gunratna sadavarte vehicle pbs