सावंतवाडी: हवामानातील बदल, वादळी वारा आणि वाढते तापमान यामुळे आंबा काजू फळ पिकांना फटका बसला आहे तर जंगलातील वन्यप्राणी देखील पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

या हंगामात मे महिन्या सारखे उष्णतेचे चटके बसत आहेत. हवामानातील तापमान ३८ ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी घटण्याची शक्यता आहे. यंदा आंबा व काजू पिकांमध्ये घट झाली आहे. पारंपरिक काजू बागायतदारांना अर्ध उत्पादन मिळण्याची शक्यता वाढली आहे. अजूनही डोंगर दऱ्यातील काजू बागायतदार चिंतेत आहेत. उशीराने आलेला मोहोर जळून गेला आहे. त्यामुळे काजू बागायतदार चिंतेत आहेत.

गेले दोन तिन दिवस सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका हातातोंडांशी आलेल्या आंबा, काजू पिकाला बसला आहे. वादळाने कोवळे काजू बी, आंबा गळून पडल्यामुळे झाडांखाली अक्षरशः कोवळ्या काजू बी, व आंब्यांचा खच्च पडल्याचे पाहायला मिळत आहे. आधीच गेले काही दिवस तीव्र उष्णतेमुळे काजू आंबा पीक करपून गेले आहे.नैसर्गिक संकटाने शेतकरी हतलब झाला आहे.

गेले काही दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. सरासरी ३८ ते ४० डिग्री तापमानाची नोंद होत आहे. या तीव्र उष्णतेने आंबा, काजुचा मोहर व कोवळी फळे करपून जात आहेत. या संकटात आणखी भर म्हणून गेले दोन दिवस सह्याद्री पट्ट्यातील गावांना  जोरदार वादळाचा सामना करावा लागत आहे. या जोरदार वादळामुळे काजूची कोवळी बी, तसेच कोवळी कैरी मोहोर गळून पडला आहे.अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.