रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे भव्य मँगो पार्क उभारणीच्या हालचालीना  वेग आला आहे. या पार्कसाठी आता प्रशासनाकडून निधीची मागणी करण्यात येत आहे. एकूण ४०० कोटीच्या निधीची मागणी निवेंडी, उंडीरीळ तसेच वाटद येथील येवू घातलेल्या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे.

 निवेंडी येथे उभारण्यात येणा-या मँगो पार्कसाठी जागेचे भुसंपादन करण्यात आले असून आता या भागात येणा -या सर्व  प्रकल्पाची उत्सुकता लागून राहिली आहे. निवेंडी येथे उभारण्यात येणा-या मँगो पार्कमध्ये आंब्यावर आधारित पूरक प्रक्रिया उद्योगाची  उभारणी करण्यात येणार आहे.  त्यामध्ये आंबा कॅनिंग, ग्रीडिंग असे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. याठिकाणी कोकणातील आंब्यांवर  आधारित सर्व प्रक्रिया आधारित उद्योगांना एकत्रित आणण्यात येणार आहे.

 रत्नागिरी विधान सभा मतदार संघात  नवनवे प्रकल्प आणण्याचे काम   उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कडून होत आहे.  अशा उद्योगांसाठी निवेंडी, उंडीरील व वाटद या गावातील जमिनीचे  भूसंपादन करण्यात येत आहे. यातील निवेंडी मँगो पार्कसाठी १४४.९९ कोटी रुपयांची मागणी तर रिळउंडी एमआयडीसीसाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, यासाठी आवश्यक चारशे कोटींच्या निधीची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे.

निवेंडी येथे मँगो पार्क उभारण्यासाठी हालचालीना वेग आला असून यासाठी १०४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. यासाठी १४४.९९ कोटी रुपयांची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे.  या मँगो पार्कमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच आंबा व्यावसायिक एकत्रित जोडले जाणार आहेत. तसेच आंबा या फळावर  आधारित सर्व प्रकिया उद्योग एकाच ठिकाणी सुरु होणार असल्याने व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच यातून मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे.