कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आंब्याची आवक कमी असल्याने सध्या हा आंबा चढय़ा दराने विकला जात आहे. नियमित आंबा बाजारात येण्यास अद्याप तीन ते चार महिन्यांचा कालावधी असला तरी बेमोसमी आंब्यामुळे बागायदार मात्र चांगलेच खूश झाले आहेत.
रायगड जिल्ह्य़ात आंबा लागवडीखालील ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात अथवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आंबा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होत असते. मात्र ही आवक कमी असल्याने पहिल्या हंगामातील या पिकाचा चांगला भाव मिळतो. यावर्षी मात्र पहिल्या हंगमातील हा आंबा चक्क डिसेंबर महिन्यातच दाखल झाला आहे. त्यामुळे बागायतदारांची चांगलीच चलती झाली आहे. या आंब्याला प्रति नग २०० ते ३०० रुपये भाव मिळत असल्याचे आंबा उत्पादकांकडून सांगितले जात आहे.
राज्यात पडलेल्या कमी पावसाने अनेक पीके अडचणीत आली असली, तरी कोकणातील आंबा पिकावर याचा उलटा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये बाजारात दाखल होणारा पहिल्या हंगामातील आंबा यंदा चक्क डिसेंबरमध्येच दाखल झाला आहे. वातावरणात सातत्याने होणारे बदल आंबा पिकासाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बागांची योग्य निगा राखली आहे. त्यांच्या झाडांना चक्क डिसेंबर महिन्यात आंबे लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.
बाजारात दाखल झालेला हा बेमोसमी आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहणार आहे. कोकणात आता चांगली थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. मोहर येण्याच्या प्रक्रियेपासून फळ तयार होण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे ९० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातून आंब्यांच्या पेटय़ांची आवक सुरू झाली असली, तरी सर्वसामान्यांना परवडेल असा आंबा मार्चअखेर अथवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत बाजारात दाखल होईल, असा अंदाज आंबा उत्पादन डॉ. संदेश पाटील यांनी व्यक्त केला.

 

* आंबा लागवडीखालील क्षेत्र  -४२ हजार हेक्टर
* उत्पादनक्षम क्षेत्र – १४ हजार ५०० हेक्टर
* २१ हजार २४ मेट्रिक टन अपेक्षित उत्पादन