हवामानातील बदल आणि गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा आंबा पीक उशिराने बाजारात दाखल होणार आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातून आंब्यांच्या पेटय़ांची आवक सुरू झाली असली तरी, सर्वसामान्यांना परवडेल असा आंबा मे महिन्याच्या अखेपर्यंत बाजारात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रायगड जिल्ह्य़ात आंबा लागवडीखालील ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मात्र अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदल यामुळे आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत केवळ ५० टक्के लागवडीखालील क्षेत्रावरच मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे फळधारण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून ९० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदा आंबा पीक बाजारात उशिराने दाखल होणार असल्याचे कृषी उपसंचालक राजाराम मोरे यांनी सांगितले.
हवामानातील बदलांमुळे यंदा आंबा पिकावर विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे नोव्हेंबरअखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला येणारा मोहर या वेळी फेब्रुवारी महिन्यातही येत आहे. काही ठिकाणी तर एकाच झाडाला तीन टप्प्यांत मोहर येण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहराचा आंबा सध्या बाजारात दाखल होतो आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा हा बोराएवढय़ा आकाराचा झाला आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील आंबा हा मोहर येण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील वाशी बाजारपेठेत कोकणातून आंब्याची आवक सुरू असली तरी तो प्रचंड महाग आहे. चांगल्या दर्जाच्या आंब्याला बाजार प्रतिनग जवळपास २०० रुपये एवढा भाव मिळत असल्याचे आंबा उत्पादन डॉ. संदेश पाटील यांनी सांगितले.
त्यामुळे सामान्यांच्या आवाक्यातील आंबा बाजारात दाखल होण्यासाठी मे महिना उजाडेल असा कयास व्यक्त केला जातो. राज्य सरकारने आंबा पिकावरील कीड व रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी हार्टसॅप ही योजना कार्यान्वित केली आहे. यानुसार आंबा पिकाचे सर्वेक्षण करण्यासाठी आठ पथकांची नेमणूक केली आहे. या आठ पथकांच्या माध्यमातून आंबा पिकाची वेळोवेळी पाहणी केली जाणार असून बागायतदारांना कीड रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे.
आंबा निर्यात वाढवण्यासाठी शासनाने मँगोनेट ही योजना कार्यान्वित केली असून जिल्ह्य़ातील ६७३ बागायतदारांनी यासाठी नोंदणी केली असल्याचे कृषी उपसंचालक मोरे यांनी सांगितले. बागायतदारांनी ऑरगॅनिक फार्मिगकडे वळावे. त्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादित मालाला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*आंबा लागवडीखालील क्षेत्र – ४२ हजार हेक्टर
*उत्पादनक्षम क्षेत्र – १४ हजार ५०० हेक्टर
*२१ हजार २४ मेट्रिक टन – अपेक्षित उत्पादन  
*५० टक्के क्षेत्रावरच मोहर येण्याची प्रक्रिया  
*कीड रोग रोखण्यासाठी आठ पथकांची स्थापना
     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा