तब्बल नऊ वेळा खासदारकी भूषवलेले तथा देशाचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे आज (१७ सप्टेंबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या (१८ सप्टेंबर) नवापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
देशाचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे नाशिकमध्ये उपचारादरम्यानक एका खासगी रुग्णालयात निधन झाले. तेनंदूरबारमधून तब्बल ९ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या नवापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गावित यांचे पुत्र तसेच मुलगी राजकारणात सक्रिय आहेत. मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार आहेत. तर पुत्र भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.
१९८१ पासून २००९ पर्यंत सतत ९ वेळा विजय
१९८१ मध्ये सुरुपसिंह नाईक यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे त्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत माणिकराव गावित विजयी झाले होते. पुढे १९८१ पासून २००९ पर्यंत सतत नऊ वेळा गावित यांच्या विजयाची परंपरा कायम राहिली होती. २००९ मध्ये सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी, प्रणव मुखर्जी यांच्यासह सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ हंगामी अध्यक्ष म्हणून गावित यांनी दिली होती. १५व्या लोकसभेत गावित आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वासुदेव आचार्य हे दोन सदस्य नऊ वेळा निवडून आले होते.