काँग्रेसचे बहुतांश मान्यवर सोनिया गांधी यांना ‘सोनियाजी’ असे संबोधत असताना त्यांचा ‘मॅडम’ म्हणून उल्लेख करणारे, सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजयश्री मिळविणारे आणि जिल्ह्य़ाच्या राजकारणात विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी आपल्या ‘दादा’ गिरीचे एकसे एक नमुने पेश करीत त्यांना नामोहरम करणारे माणिकराव होडल्या गावित हे पुन्हा एकदा केंद्रात मंत्री झाल्याने महाराष्ट्रातील अवघे काँग्रेसजन आनंदित झाले आहेत. गावित यांना मंत्रिपद देऊन काँग्रेसने राज्याच्या राजकारणात एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.
केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेले ‘माणिकदादा’ १९८१ पासून सलग नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आल्यास त्यांच्या नावावर विक्रमाची नोंद होईल. नवापूर तालुक्यातील धुलिपाडा येथील सरपंचपदापासून माणिकरावांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. तत्पूर्वी विविध कार्यकारी संस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ नोकरी केली. काँग्रेसचे कट्टर पाईक असलेल्या माणिकरावांना राजकारणात भराभर यश मिळत गेले. प्रचंड लोकसंग्रह, रस्त्याने कारमधून जात असताना कोणी पायी चालताना दिसले तरी कार थांबवून त्याची विचारपूस करण्याच्या त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे विरोधकांनाही त्यांच्याशी दोस्ती करावीशी वाटते. २००६ मध्ये माणिकराव केंद्रात गृहराज्यमंत्री होते. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. गृहराज्यमंत्री असतानाच त्यांनी नवापूर-सुरत-उधना रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला. लोकसभेचे हंगामी सभापतीपदही भूषविण्याची संधी त्यांना मिळाली.
नंदुरबारच्या राजकारणात सुरूपसिंग नाईक आणि माणिकराव यांची जोडी प्रसिद्ध आहे. परंतु मागील निवडणुकीत सुरूपसिंग यांना पराभव पत्करावा लागला तर, माणिकराव पुन्हा एकदा विजयी झाले. गांधी घराण्याच्या अगदी जवळचे असल्याने त्यांचा राज्याच्या राजकारणातही चांगलाच दबदबा आहे. देशातील प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात गांधी घराण्याकडून नंदुरबारमधील सभेनेच होते. केवळ मागील निवडणुकांप्रसंगी हा शिरस्ता मोडला गेला. माणिकरावांना काँग्रेसने सर्व काही दिले आहे. ज्येष्ठ कन्या हेमलता वळवी या नंदुरबारच्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या तर, द्वितीय कन्या निर्मला गावित इगतपुरीच्या विद्यमान आमदार आहेत. मुलगा भरत गावित विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे सध्या त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आदिवासी विकास मंत्री असताना डॉ. गावित यांनी नंदुरबार या काँग्रेसच्या पारंपरिक जिल्ह्य़ात जोरदार धडक दिली होती. लोकसभेच्या मागील निवडणुकीत डॉ. गावित यांचे बंधू शरद गावित यांनी माणिकरावांविरुद्ध अपक्ष उमेदवारी केली होती. त्या वेळी राष्ट्रवादीची सर्व फौज शरद गावित यांच्या पाठीशी असूनही ते सर्वाना पुरून उरले. नंदुरबार पालिका निवडणुकीतही ३३ पैकी ३२ जागा जिंकून आणत माणिकरावांनी आपली ताकद डॉ. गावित यांना दाखवून दिली. लोकसभेच्या येत्या निवडणुकीसाठी अॅड. पद्माकर वळवी यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. त्यातच राष्ट्रवादीने मधुकर पिचड यांना आदिवासी विकासमंत्री केल्याने आदिवासींची मते राष्ट्रवादीकडे जाऊ नयेत यासाठी काँग्रेसने माणिकरावांना मंत्रिपद देऊन राष्ट्रवादीसह वळवी आणि डॉ. गावित यांना चपराक दिल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीला रोखण्यासाठीच माणिकदादांना मंत्रिपद
काँग्रेसचे बहुतांश मान्यवर सोनिया गांधी यांना ‘सोनियाजी’ असे संबोधत असताना त्यांचा ‘मॅडम’ म्हणून उल्लेख करणारे, सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजयश्री मिळविणारे आणि जिल्ह्य़ाच्या राजकारणात विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी आपल्या ‘दादा’ गिरीचे एकसे एक नमुने पेश करीत त्यांना नामोहरम करणारे माणिकराव होडल्या गावित हे पुन्हा एकदा केंद्रात मंत्री झाल्याने महाराष्ट्रातील अवघे काँग्रेसजन आनंदित झाले आहेत
आणखी वाचा
First published on: 18-06-2013 at 01:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manikrao gavit gavit get cabinet ministers to stop ncp in maharashtra