एका नियुक्तीच्या मुद्दय़ावरून थेट प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप करणाऱ्या स्थानिक काँग्रेस नेत्यांचे एक जंबो शिष्टमंडळ पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी आज दिल्लीला रवाना झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रदेश काँग्रेसने गेल्या आठवडय़ात चंद्रपूर ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून प्रकाश देवतळे यांना नियुक्त केले. या पदासाठी येथे सक्रिय असलेले माजी खासदार नरेश पुगलिया व पालकमंत्री संजय देवतळे यांचे गट इच्छुक होते. त्यांना डावलून वडेट्टीवार गटाचे देवतळे यांची निवड करण्यात आली. यावरून पुगलिया गटाच्या नेत्यांनी थेट ठाकरे व मोहन प्रकाश यांच्यावरच गंभीर आरोप केल्याने गेल्या आठवडाभरापासून हे प्रकरण गाजत आहे. ठाकरे व मोहन प्रकाश यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून ही नियुक्ती केली, असा थेट आरोप येथील महापौर संगीता अमृतकर व माजी आमदार बाबूराव वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला. या आरोपाची दखल घेत प्रदेश काँग्रेसने या दोघांवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी या दोघांना सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. ठाकरे व मोहन प्रकाश यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले असले तरी येथील नेत्यांनी मात्र हा मुद्दा आता दिल्ली दरबारी नेण्याचे ठरवले आहे.  
 त्याचाच एक भाग म्हणून महापौर अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली आज १०७ पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झाले.
यात जिल्ह्य़ातील पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, तसेच विविध आघाडय़ांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
प्रदेश काँग्रेसने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी आता थेट ठाकरे व मोहन प्रकाश यांना आव्हान देण्याची भूमिका येथील पुगलिया गटाने घेतल्याने हा वाद आणखी रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिष्टमंडळातील पदाधिकारी मंगळवारी सोनिया गांधी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतील व त्यांना ठाकरे व मोहन प्रकाश यांच्याविषयीच्या तक्रारी सांगतील, अशी माहिती येथील महापालिकेचे नगरसेवक अशोक नागापुरे यांनी दिली. या शिष्टमंडळात नरेश पुगलियाही सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. याआधी प्रभा राव अध्यक्ष असताना याच पुगलिया गटाने एका नियुक्तीवरून थेट राव यांच्यावर आरोप करून त्यांना अडचणीत आणले होते. आता या गटाने थेट ठाकरेंशी पंगा घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा वाद रंगणार आहे.

Story img Loader