पूर्ती प्रकरण नितीन गडकरी यांचा पिच्छा सोडत नसल्याचे पुन्हा दिसू लागले आहे. या उद्योगसमूहात नागपूरचे उद्योजक मनीष मेहता यांचा संबंध असल्याचे एस. गुरुमूर्ती यांनी भाजप नेतृत्वाला सांगितल्याने आणखी एका व्यावसायिक मित्रामुळे गडकरी अडचणीत आले आहेत.
पूर्ती उद्योगसमूहाबाबत काही दिवसांपूर्वी झालेले आरोप गडकरी यांच्यासाठी बरेच त्रासदायक ठरले होते. या समूहातील काही कंपन्यांचे जे पत्ते देण्यात आले होते, त्या पत्त्यावर अशा कंपन्या अस्तित्वातच नसल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नितीन गडकरी यांची अध्यक्षपदाची दुसरी टर्म निश्चित असल्याचे महिनाभरापूर्वीपर्यंत मानले जात होते. मात्र या आरोपांनंतर रा.स्व. संघालाही त्यांची पाठराखण करणे कठीण जात आहे. संघ नेतृत्वाने वरकरणी गडकरी यांना विरोध केलेला नसला, तरी भ्रष्टाचाराचे आरोप असताना गडकरी यांना भाजपच्या अध्यक्षपदी ठेवले जाण्यास संघ परिवारातच विरोध होत आहे. याशिवाय, भ्रष्टाचाराच्या मालिकेत अडकलेल्या काँग्रेस पक्षावरील भाजपच्या हल्ल्याची धार एकदम बोथट होऊन गेली आहे.
गडकरी यांच्या पूर्ती उद्योगसमूहातील १४ कंपन्यांमध्ये मनीष मेहता यांनी गुंतवणूक केली असल्याचे एस. गुरुमूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेतृत्वाला सांगितले. या कंपन्यांचा कुणी मालक नसल्याचे चित्र प्रसारमाध्यमांमध्ये रंगवले गेले असले, तरी या १४ कंपन्या मेहता यांच्या मालकीच्या असल्याचेही गुरुमूर्ती यांनी सांगितले आहे. मनीष मेहता यांच्यावर फसवणुकीच्या दोन आरोपांखाली खटले प्रलंबित असल्याने पूर्ती प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. यापैकी एक प्रकरण सीबीआयने, तर दुसरे पोलिसांनी दाखल केले आहे.
नागपुरातील प्रसिद्ध उद्योजक असलेले मनीष मेहता हे ‘म्युनिस फोर्ज लिमिटेड’ कंपनीचे प्रमोटर असलेल्या मेहता कुटुंबाने केलल्या कथित घोटाळ्यात अडकलेले आहेत. मेहता कुटुंबियांनी या प्रकरणात २००३ साली बँकेतून फार मोठय़ा रकमा काढल्याचा आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणी मनीष मेहता व त्यांच्या भावाविरुद्ध २००६ साली आरोपपत्र दाखल केले. मूळ रक्कम, बँकेचे व्याज आणि दंडाची रक्कम मिळून या घोटाळ्यातील एकूण रक्कम दीडशे कोटी रुपयांपर्यंत असू शकते. सीबीआय अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहे.
जमिनीच्या एका घोटाळ्यातही मनीष मेहता यांचे नाव गोवले गेले आहे. नरेश ठाकरे नावाच्या व्यक्तीकडून त्यांनी १०० एकरहून अधिक जमीन खरेदी केली आणि बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ती तारण ठेवली. मेहता यांना या घोटाळ्याची कल्पना असूनही त्यांनी या प्रकरणी मौन पाळले. मनीष मेहता व त्यांच्या भावाविरुद्ध ही प्रकरणे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित आहेत.
घोटाळेबाज मनीष मेहतामुळे गडकरी अडचणीत
पूर्ती प्रकरण नितीन गडकरी यांचा पिच्छा सोडत नसल्याचे पुन्हा दिसू लागले आहे. या उद्योगसमूहात नागपूरचे उद्योजक मनीष मेहता यांचा संबंध असल्याचे एस. गुरुमूर्ती यांनी भाजप नेतृत्वाला सांगितल्याने आणखी एका व्यावसायिक मित्रामुळे गडकरी अडचणीत आले आहेत.
First published on: 16-11-2012 at 01:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish mehta is the big reason of gadkari problem